बार्शीत फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, तीन महिलांचा मृत्यू

सोलापूर : बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील शिराळे गावात फटाका फॅक्टरीत झालेल्या स्फोटात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. एका रुग्णाची परिस्थिती अत्यंत नाजूक झाल्याने त्याला उपचारासाठी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होते आहे. ही घटना घडल्यानंतर साधारणतः तासाभराने पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचलं आणि त्यांनी मदत तसंच बचावकार्याला सुरूवात केली.
मराठवाडा सीमेवर असलेल्या पांगरी हे मोठे गाव असून तेथे स्वतंत्र पोलीस ठाणेही कार्यरत आहे. तेथून जवळच शिराळा गावच्या शिवारात माळरानावर शोभेच्या दारू निर्मितीचा कारखाना आहे. दुपारी या कारखान्यात नेहमीप्रमाणे कामगार काम करीत असताना अचानकपणे शोभेच्या दारूचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की आसपासच्या काही किलोमीटर अंतरावरचा परिसर हादरला. तेव्हा लगेचच स्थानिक तरूणांनी दुर्घटनाग्रस्त कारखान्याच्या दिशेने धाव घेतली. कारखान्यात एका पाठोपाठ एक शोभेच्या दारूचा स्फोट होत होता. कारखान्यातील कामगार या दुर्घटनेत सापडले आणि गंभीर भाजून जखमी झाले. काही कामगार गंभीर जखमी अवस्थेत जिवाच्या आकांताने स्वतः काही अंतरावर मोकळ्या मैदानावर येऊन पडले होते. शरीर भाजून काळे पडलेले हे कामगार असह्य वेदनांनी विव्हळत होते.




