नीलम गोऱ्हे यांनी आपला पूर्व इतिहास तपासावा- संदीप खर्डेकर

पुणे : विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीत ५ जिल्ह्यातील मतदार मतदान करत असतात.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा ,कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे अश्या ५ जिल्ह्यातून पदवीधरची निवडणूक लढवून दोन वेळा विजयी झालेले चंद्रकांत पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील आणि राज्यातील सर्वमान्य नेते आहेत. सातत्याने मागच्या दाराने विधानपरिषदेत प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना किमान आपली पूर्वपीठिका तपासून पहावी अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मधून पुन्हा निवडून येऊन दाखवा असे आव्हान नीलम गोऱ्हे यांच्याकडून देण्यात आल्यानंतर त्याला भाजपकडून पुणे शहर मुख्य प्रवक्ता संदीप खर्डेकर यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

खर्डेकर यांनी म्हंटले आहे की, मी या निवेदनाद्वारे नीलम गोऱ्हे यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, चंद्रकांत पाटील हे कोथरूड मधून मनसे आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त शक्तीला तोंड देऊन बहुमताने निवडून आले आहेत. त्यांच्या पराभवासाठी जाणत्या राजांसह राज्यातील अनेक नेते जीवाचे रान करत होते. तरीही चंद्रकांत पाटील आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लक्षणीय विजय नोंदविला. त्यामुळे पाटील यांनी कोथरूड मधून पुन्हा निवडून येऊन दाखवा असे आव्हान देताना नीलम गोऱ्हे स्वतः जनतेतून कधी निवडणूक लढविणार हे त्यांनी स्पष्ट करावे आणि मग सलग तीन वेळा जनतेतून निवडून आलेल्या चंद्रकांत पाटील यांना आव्हान द्यावे. असे प्रती आव्हान खर्डेकर यांनी दिले आहे.



गोऱ्हे यांनी दरबारी राजकारण सोडावे आणि चंद्रकांत पाटील यांनी अभाविप च्या प्रचारक पदापासून आजपर्यंत जो कार्यकर्त्यांचा मोहोळ उभा केला आहे त्याचा आदर्श घ्यावा आणि जनतेत काम करावे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ याबाबतीत आत्मपरीक्षण करावे आणि या सरकारच्या काळात महिलांना जाळण्यापर्यंत मजल गेलेल्या नराधमांना कायद्याची भीती राहिलेली नाही याबाबतीत आंदोलन उभारावे असेही खर्डेकर यांनी म्हंटले आहे.







































