मौर्यविहार सोसायटीतील नागरिकांना बाप्पा पावला. दिवाळीचे मोठे गिफ्ट

पुणे : मौर्यविहार कॉलनीतून डीपी रस्त्याकडे येणाऱ्या नाल्यावरील पुलाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. गेली तेवीस वर्षांपासून अडथळ्यांच्या शर्यतीत रखडलेला हा रस्ता नगरसेवक किरण दगडेपाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना आता कोथरूडला येण्यासाठी अडीच किलोमीटरचा वळसा घालावा लागणार नाही.
सहस्त्रबुद्धे गिरणीमार्गे मौर्यविहार कॉलनी आणि श्रीकांत ठाकरे डीपी रस्ता यांच्यामध्ये दक्षिणोत्तर नाला आहे. त्याची रूंदी अवघे अडीचशे मीटर आहे. तथापि मौर्यविहार, सहजानंदसह परिसरातील सत्तावीस सोसायट्यातील नागरिकांना अडीच किलोमीटरचा वळसा मारून कोथरूडकडे यावे लागत होते. परंतू धुणीभांडी करणाऱ्या कामगार महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक नाल्यातूनच कशीबशी वाट काढत येजा करीत होते. नाल्यात घाणीचे साम्राज्य पसरले होते. तरीदेखील दररोजचा भाजीपाला, औषधे, किराणा आणण्यासाठी खुश्कीचा मार्ग (शॉर्टकट) म्हणून नाक मुठीत धरून नाल्याचा उपयोग होत होता.

निवडणूकीच्या निमीत्ताने किरण दगडे या भागात प्रचारासाठी गेले. त्यावेळी नागरिकांनी ही समस्या त्यांच्यापुढे मांडली. त्यावेळी त्यांनीही प्राधान्याने हे काम करण्याचे वचन नागरिकांना दिले. आयुक्त, महापौर यांच्यासमवेत बैठक करून रस्त्यात येणाऱ्या जागेचा बिल्डरला महापालिकेकडून टीडीआर दिला. दगडे यांनी बजेटमधून पन्नास लाखाची तरतूद केली. गेल्यावर्षी जानेवारीत त्याचे भूमिपूजनही झाले.



दगडे यांच्या पाठपुराव्यामुळे सगळे अडथळे दूर होत गेले. सध्या पूलाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून नागरिकांनी त्याचा वापरही सुरू केला आहे. या पूलामुळे आता नागरिकांचा अडीच किलोमीटरचा वळसा वाचणार आहे. त्यासाठी वेळ, पेट्रोल आणि पैशाचीही बचत झाली आहे. दगडेपाटील यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रभाग समिती सदस्य वैभव मिरकुटे, प्रभाग अध्यक्ष सागर कडू, भाजपाचे प्रभारी राजेश कुलकर्णी, प्रतिक वायकर, अनिल घाटकर, हनुमंत कडलक, श्रीधर जगताप, निलम घाटकर, अंजली दांडेकर, भरत पडवळ, राजू अभंग, मौर्यविहार आणि सहजानंद सोसायटीतील महिला पुरूष उपस्थित होते.



नागरिकांच्या प्रतिक्रिया –
अनिल घाटकर (रहिवाशी) – नाल्यावर पूल व्हावा यासाठी गेली तेवीस वर्षापासून आम्ही यापूर्वीचे नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी यांच्याकडे चकरा मारल्या. आंदोलनेही केली. परंतू आम्हाला अपयशच आले. तथापि किरण दगडे यांनी निवडणूकीपूर्वीच दिलेला शब्द खरा केला. त्यांच्या या कामामुळे आमच्या भागातील हजारो नागरिकांची कोथरूडकडे येण्यासाठीची समस्या कायमस्वरूपी दूर झाली आहे.
किरण दगडे (नगरसेवक) – अनेक वर्षे या रस्त्याचे राजकारण केले गेले. अनेक अडथळेही आले. परंतू पूलाबाबत नागरिकांना दिलेला शब्द पाळून तो पूर्ण केल्याचे समाधान आहे. यासाठी सिटी इंजिनिअर प्रशांत वाघमारे यांनी मेहनत घेतली. इथे सुसज्ज उद्यानही उभारण्याचा मानस आहे.

































