राज ठाकरेंची सभा 21 मे रोजी ‘या’ ठिकाणी ?

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा 21 मे 2022 रोजी डेक्कन जिमखाना येथील नदीपात्रात रस्त्यावरील मैदानावर होणार असल्याचे सांगितले जात आहे.
मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसेने पुकारलेल्या आंदोलनावरून महाविकास आघाडीकडून राज ठाकरे हे जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता पुण्यातील सभेत कोणती नवी भूमिका मांडणार, हे पाहावे लागेल. या सभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुणे पोलिसांकडे परवानगी मागितली आहे.
राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला परवानगी देणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर गृहमंत्र्यांनी म्हटले की, राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारण्याचे कारण दिसत नाही. पोलीस आयुक्त या सभेला परवानगी देतील. मात्र, मनसेने पोलीस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.
दिलीप वळसे-पाटील यांनी सोमवारी पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या राड्यासंदर्भातही भाष्य केले. यासंदर्भात पोलीस योग्य ती कारवाई करतील. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चूक केली असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. भाजपच्या कार्यकर्त्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई होतील. भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करणे ही आक्षेपार्ह बाब आहे. यासंदर्भात पुणे पोलीस योग्य ती कारवाई करतील, असे दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.




