चांदणी चौकातील प्रश्नांबाबत भिमराव तापकीर यांच्या महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना..

चांदणी चौक उड्डाणपुल व सर्व्हिस रस्त्यांची करण्यात आली पाहणी.
पुणे : pune city कोथरुड येथील चांदणी चौक येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे होत असलेली वाहतूक कोंडी सुटावी यासाठी आज खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर व नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडिया लि. पुणेचे मुख्य व्यवस्थापक संजय कदम यांच्या समवेत सुरू असलेल्या कामाची व सर्व्हिस रस्त्यांची पाहणी केली.
यावेळी चांदणी चौकाकडून भुसारी काॅलनी कडे येणारा रस्ता, शृंगेरी मठ, डावी भुसारी काॅलनीकडून वारजेला जोडणारा सर्व्हिस रस्ता १५ दिवसात नागरीकांसाठी खुला करावा अशा सूचना तापकीर यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांना केल्या.
यावेळी नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, किरण दगडेपाटील, नगरसेविका डाॅ.श्रद्धा प्रभुणे, किरण बारटक्के, ॲड. गणेश वरपे, वैभव मुरकुटे, बाळासाहेब टेमकर, डाॅ.मनिषा जाधव, राजेश भेगडे, रूपेश भोसले, अमोल शिर्के, प्रादेशिक अभियंता तसेच चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्प सल्लागार अशोक दुग्गर, प्रोजेक्ट इंनचार्ज डी. श्रीनिवास राव, संपर्क अधिकारी किशोर भरेकर आदि उपस्थित होते. पाहणीचे नियोजन नगरसेविका अल्पना वरपे व गणेश वरपे यांनी केले होते.
आमदार भिमराव तापकीर यांनी यावेळी वेदभवन मंदिराबाबत मा.घैसास गुरूजी यंसोबत देखील चर्चा केली व त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले. याबाबत त्यांनीही सकारात्मकता दर्शविली. याचवेळी वेदविहार व परिसरातील सोसायट्यांना वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे तसेच याच रस्त्यावर खड्डा होऊन त्यात पाणी साठत असल्याचे तसेच महात्मा सोसायटीकडे हायवे वरून वळताना पुढे यूटर्न घ्यावा लागतो व त्यामुळे वाहनचालकांना पुढे जाऊन वळून यावे लागते,या सर्व समस्या अधिकार्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना कदम यांनी संबंधितांना दिल्या.

तापकीर म्हणाले की, चांदणी चौकात होत असलेल्या बहुमजली उड्डाण पुलाचे काम अतिशय वेगात सुरू आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर येथील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. आता काम सुरू असताना होत असलेली वाहतूक कोंडी सुटवी यासाठी आज पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून डाव्या भुसारी कॉलनीतून वारजेकडे जाणारा सर्व्हिस रस्ता तातडीने सुरू करावा असे सांगण्यात आले आहे.
अल्पना वरपे म्हणाल्या की, डाव्या भुसारी कॉलनी येथील अर्धवट राहिलेल्या सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी मी सातत्याने संबधित महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत होते. हे रस्त्याचे काम आता पूर्ण होत आले आहे. हा सर्व्हिस रस्ता वाहतुकीस खुला झाल्यानंतर डाव्या भुसारी कॉलनी पासून सर्व्हिस रस्त्याने वारजेपर्यंत पोहचता येणार आहे. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे काम होत असताना नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो, त्यासाठी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष ठिकाणी आणून पाहणी करून नियोजनपूर्वक मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे किरण दगडे पाटील, दिलीप वेडेपाटील, अल्पना वरपे यांनी सांगितले.


















