कोथरुड

शर्वरी मुठे यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी – संदीप खर्डेकर.

कोथरूड : वस्ती विभागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही किंबहुना अनेकजण शाळेतच जात नाहीत हे लक्षात आल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण झालेल्या ऍड. शर्वरी मुठे यांनी 2017 साली आपली प्रॅक्टिस सोडून अश्या मुलामुलींना शिकविण्याचा ध्यास घेतला हे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.

मुकुलमाधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स पाईप्सच्या वतीने आज जिव्हाळा फाउंडेशनच्या अनुराधा पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

खर्डेकर म्हणाले, कर्वेनगर परिसरातील हिंगणे होम कॉलनी, संभा वस्ती तसेच डहाणूकर कॉलनीतील लक्ष्मीनगर वस्तीतील 100 मुलं आज ह्या छोटेखानी शाळेत विपरीत परिस्थितीत पूर्व प्राथमिक शिक्षण घेत आहेत. आता तर यात भर पडून 35 मुली ह्या निवासी आहेत आणि हे सगळे नाममात्र शुल्कात, किंबहुना काहींची तर नाममात्र शुल्क देण्याचीही परिस्थिती नाही, मात्र पुरेशी स्वतःची जागा नाही, पुरेसे साहित्य नाही, अन्य भौतिक सोयीसुविधा नाहीत मात्र ह्या अडचणीवर मात करून शर्वरीताईंचे कार्य सुरु आहे हा आदर्श समाजातील इतर सुखवस्तू घटकांनी गिरवावा.

मुकुलमाधव फाउंडेशन चे समन्वयक सचिन कुलकर्णी म्हणाले, समाजात चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी मुकुलमाधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स पाईप्स ठामपणे उभे असून निस्पृह कार्य करणाऱ्यांना समाज ही मदतीचा हात देतो.

ह्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शर्वरी मुठे यांनी संस्थेचे आभार मानले व येणाऱ्या काळात अधिक चांगले कार्य करण्याची प्रेरणा अश्या मदतीने मिळते असेही त्या म्हणाल्या. तसेच सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून मी हे कार्य हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच निवासी असलेल्या 35 मुलींचा सर्व खर्च संस्था करत असून त्यांना शिक्षण, निवास व्यवस्था, वाहन व्यवस्था, भोजन सर्व काही मोफत असल्याचे ही मुठे यांनी स्पष्ट केले.

विविध कंपन्यांनी असे पथदर्शी कार्य करणाऱ्यांना सी एस आर फंडाच्या माध्यमातून आधार द्यावा असे आवाहन संदीप खर्डेकर यांनी यावेळी केले. यावेळी योगेश रोकडे, रोहन दाभाडे, शाळेतील शिक्षिका उपस्थित होत्या.

Img 20220804 wa0019951227047229036961

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये