कोथरूडमधील भुसारी कॉलनीतील पालिकेच्या ताब्यातील अमेनिटी स्पेसवर होणार आधुनिक क्रीडा संकुल !

किरण दगडे पाटील यांनी नागरिकांशी चर्चा करत केली जागेची पाहणी
कोथरूड : कोथरूड भुसारी कॉलनीतील न्यू इंडिया शाळेच्या शेजारील सर्व्हे नं. ९६ मधील पुणे महानगरपालिका ताब्यातील अमेनिटी स्पेसवर स्विमिंग पूल, बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, योगा व मेडिटेशन हॉल आदी सुविधा असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक क्रीडा संकुल प्रकल्पाचा प्रस्ताव नागरिकांसमोर मांडत माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनातून एक महत्वपूर्ण पाऊल या आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक क्रीडा संकुलाच्या माध्यमातून टाकले जात असल्याचे किरण दगडे पाटील यांनी सांगितले.

आज किरण दगडे पाटील यांनी सदर जागेची प्रत्यक्ष पाहणी करत परिसरातील नागरिकांसोबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी मकरंद शेटे, सतीश पवार, निकम, बोंबे आदी मान्यवर उपस्थित होते.
हे क्रीडा संकुल तयार करण्याबरोबरच या अमेनिटी स्पेसमधून टेकडीवर जाण्यासाठी सुटसुटीत व सुरक्षित नवीन मार्ग तयार करून देण्याचा सकारात्मक पर्यायही यावेळी नागरिकांसमोर ठेवण्यात आला आहे. हा उपक्रम केवळ क्रीडाक्षेत्राचा विकास नव्हे, तर परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यदायी, सकस व सक्रीय जीवनशैलीकडे जाणारा एक प्रभावी व प्रेरणादायी टप्पा ठरेल असा विश्वास किरण दगडे पाटील यांनी व्यक्त केला आहे.






