पुणे शहर व जिल्ह्यातील दहीहंडी उत्सवाची वेळ वाढवून गणेशोत्सवाप्रमाणे रात्री १२ वाजेपर्यंत करावी – शहराध्यक्ष दीपक मानकर

पुणे : पुणे शहर व जिल्हा या ठिकाणी दहीहंडीची वेळ रात्री १२.०० वा. पर्यंत करावी जेणेकरून दहीहंडी उत्सव पारंपारिक पद्धतीने अजून मोठ्या उत्साहात साजरा करता येईल व याचा आनंद संबंध पुणे शहर व जिल्ह्यातील बालगोपाळ व नागरिकांना घेता येईल अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
पुणे शहर व जिल्ह्यामध्ये अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पारंपारिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. यावर्षी सुद्धा दि. ०७ सप्टेंबर २०२३ रोजी दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. मागील वर्षी राज्याचे मुख्यमंत्री यांनी सर्व
बालगोपाळ व नागरिकांना या उत्सवाचा आनंद घेता यावा या उद्देशाने दहीहंडी उत्सवास शासकीय सुट्टी जाहीर केली आहे.
सदरील दहीहंडी उत्सव साजरा करीत असताना पुणे शहर व जिल्ह्यामध्ये दहीहंडी फोडण्याची अर्थात कार्यक्रमाची वेळ ही रात्री १०.०० वाजेपर्यंत असते परंतु ही वेळ खूप कमी पडते, असे गेली अनेक वर्षे निदर्शनास येत आहे. याचे कारण असे की दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी जवळपास महिनाभर सर्व कार्यकर्ते झटत असतात आणि ज्या दिवशी कार्यक्रम आहे
त्यादिवशी सायंकाळी फ़क़्त ७.०० ते १०.०० असे तीनच तास कार्यक्रम साजरा करता येतो

आणि दुसरे महत्वाचे कारण असे की पुणे शहर व उपनगरामध्ये ज्या दहीहंडी असतात त्या फोडण्यासाठी जी पथके येतात ती सर्व पथके मुंबई, बारामती सह अनेक भागातून येत असतात व
या पथकांची संख्या कमी असल्यामुळे तसेच त्यादिवशी सर्वत्र गर्दी असल्याने या पथकांना प्रत्येक मंडळामध्ये पोहोचणे शक्य होत नाही. यामुळे बऱ्याच मंडळांना दहीहंडी ही खाली घेवून फोडावी लागते यामुळे तिथे जमलेल्या बालगोपाळ, नागरिक व कार्यकर्त्यांचा हिरमोड होतो. त्यामूळे पुणे शहर व जिल्हा या ठिकाणी दहीहंडीची वेळ रात्री १२.०० वा. पर्यंत करावी जेणेकरून दहीहंडी उत्सव पारंपारिक पद्धतीने अजून मोठ्या उत्साहात साजरा करता येईल अशी मागणी मानकर यांनी केली आहे.












