कोथरूडमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गिरीश गुरनानींचे क्षेत्रीय कार्यालयास निवेदन

पुणे : पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न पुण्यातील कोथरूड येथील नागरिकांना पडला आहे. अत्यंत त्रासदायक परिस्थितीत पुणेकरांना जीव मुठीत घेऊन दैनंदिन प्रवास करायला लागत आहे. याचीच दखल घेत अनेक नागरिकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. यास अनुसरून राष्ट्रवादी युवकचे कोथरूड अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी क्षेत्रीय कार्यालय येथे अध्यक्षांना निवेदन दिले आहे.
येवढे बजेट रस्त्यांसाठी असताना आणि नजीकच्या काळात रस्ते बांधणी केलेली असताना ही खड्डे पडले कसे हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. एवढे मोठे बजेट काढून ठेकेदार सर्रास पणे निकृष्ट दर्जाचा माल वापरुन कामे करत असतात आणि प्रशासन यावर जाणून बुजून दुर्लक्ष करतात असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. “आता खड्डे बुजविण्यासाठी पुन्हा नव्याने बजेट काढून नागरीकांनी प्रामाणिकपणे भरलेल्या टॅक्स हा तुम्हा खड्डे बुजविण्यासाठी व त्या ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी वापरणार का?” असाही सवाल नागरीकांच्या वतीने गिरीश गुरनानी यांनी उपस्थित केला.

“पौड रस्त्यावर पावसाळ्या आधीच कामे केलेले चेंबर्स आता पुन्हा खचलेल्या अवस्थेत दिसत आहेत व यामुळे मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. आपण अपघात झाल्यावरच तुम्हाला जाग येणार का?” हे ही गुरनानी यांनी प्रकर्षाने नमूद केले. प्रत्येक ठेकेदार हा कुठल्या ना कुठल्या नेत्याचा कार्यकर्ता किंवा नातेवाईक असतो तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करावी असे निवेदन युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी नागरिकांच्या वतीने दिले.या वेळी कोथरूड युवक वरिष्ठ उपाध्यक्ष अमोल गायकवाड ,संघटक सचिव ऋषिकेश शिंदे ,सरचिटणीस आयुष बोडके व विद्यार्थीचे अध्यक्ष अधिराज कसबे उपस्थित होते.









