तर मुरलीधर मोहोळ यांचे कोथरूड मधील मताधिक्य आणखी वाढले असते..

कोथरूड : पुणे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवत इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. पुणे लोकसभेचे निवडणूक अनेक मुद्द्यांनी गाजली. या निवडणुकीत विजय उमेदवारच मताधिक्य किती असेल याबाबत पुणेकरांना उत्सुकता होतीच पण कोथरूड मतदार संघातून मोहोळ यांना किती मतांची आघाडी मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला त्यात मुरलीधर मोहोळ यांचे होम पीच त्यामुळे येथून मताधिक्य मिळणार हे नक्कीच होते पण ते किती असणारा याबाबत निवडणुकीत रंग भरू लागले तशा चर्चा ही घडू लागल्या, कोथरूडच्या मताधिक्यावर पैजा ही लागल्या. मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना १ लाख ६ हजारांचे मताधिक्य मिळाले होते, तेवढे मताधिक्य मोहोळ यांना मिळणार का ते कमी होणार या बाबत चर्चा घडतं होत्या. कोथरूड मधील प्रत्येक लहान मोठ्या हॉटेलच्या टेबलावर, कट्ट्यांवर हीच चर्चा कानी पडत होती.



काही करून कोथरूड मध्ये मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य कमी करायचे असा चंगच विरोधी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बांधल्याचे निवडणुकीत दिसून आले. त्यांनी कोथरूडवर सुरवातीपासून विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्यांच्या प्रचारातून ते दिसत होते. कर्वेनगर, कोथरूड चा झोपडपट्टीचा भाग, बैठ्या घरांचा भाग या ठिकाणी धंगेकरांनी जोरात प्रचार केला होता. त्यामुळे मोहोळ कोथरूड मधून मताधिक्य किती घेणार याबाबत उत्सुकता लागून राहिलेली होती.
प्रत्येक निवडणुकीचे समीकरण वेगळे असते त्यामुळे मोहोळ यांचे मताधिक्य किमी जास्त होणार हे नक्की होते. तरी कोथरूड मधून मोहोळ यांना १ लाख ४१ हजार ९२८ मते मिळाली तर धंगेकर यांना ६७ हजार ६७१ मते मिळाली. मोहोळ यांना ७४ हजार २५७ मतांची आघाडी कोथरूडकारांनी दिली आणि या आघाडीने मोहोळ यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.



मागच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतांची आघाडी कमी झाल्याचे बोलले जात असले तरी त्याला अनेक कारणे आहेत. त्या पैकी एक म्हणजे कोथरूड मधील ३८ हजारांच्या वर मतदारांची नावे मतदान यादीतून वगळली गेली होती. मतदार यादीतून नावे उडालेला मतदार हा जास्त करून सोसायटी विभागातला होता हे निवडणुकीच्या दिवशी दिसून आले. निवडणुकीच्या दिवशी मतदार यादीतून नाव वगळले गेल्याने मतदान करता येत नाही म्हणून मतदारांची चीड चीड होत असल्याचे कोथरूड मधील अनेक मतदान केंद्रांवर दिसून आले होते. ही नावे जर मतदार यादीतून वगळली गेली नसती तर कोथरूड मधील मोहोळ यांचे मताधिक्य आणखी काही हजार मतांनी वाढायला मदत झाली असती. पण या मतदार यादीतून वगळलेल्या मतांचा फटका सर्वात जास्त मोहोळ यांना बसला आहे.



























