अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची राष्ट्रवादी कोथरुड मतदार संघाची मागणी

हर्षवर्धन मानकर यांच्याकडून कोथरूड पोलिसांना निवेदन
पुणे : कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात गलिच्छ वक्तव्य केल्याने त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांनी कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी धनंजय पायगुडे, नवनाथ खिलारे, ऋषिकेश डफळ, अविनाश गायकवाड, दस्तगीर शेख, विजय बाबर, अफसर शेख, आशिष शिंदे, रोहिदास जोरी, लखन सौदागर आदी उपस्थित होते.
हर्षवर्धन मानकर म्हणाले, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेले गलिच्छ वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही. स्त्रियांचा अपमान करणाऱ्या स्त्रीद्रोह्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन युती सरकारला कोणते हिंदुत्व दर्शवायचे आहे?

माता-भगिनींचा अपमान करण्याची शिकवण तर बाळासाहेबांच्या हिंदुत्वात नव्हती. राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले, ताराराणी या कर्तुत्ववान महिलांचा पराक्रमी इतिहास असणाऱ्या महाराष्ट्रात महिलांना हीन दर्जाची वागणूक राष्ट्रवादी सहन करणार नाही. महिलांचा अपमान करणारा कुणीही असला तरी त्याच्याविरुद्ध कडक कारवाई झालीच पाहिजे असे मानकर यांनी म्हंटले आहे.


















