डंपरने धडक दिल्याने ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू, पौड रस्त्यावरील घटना

कोथरुड : पौड रस्त्यावर भुसारी कॉलनी येथे बालाजी ऑटो समोर भरधाव डंपरने उडवल्याने रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सायंकाळी ५.३० च्या सुमारास हा अपघात घडला. road accident, Pune local news
मृत महिले जवळ सापडलेल्या बस पासवरून संबंधित महिलेचे नाव शारदाबाई पंडित कांबळे ( वय ६३ रा. दत्तनगर हनुमाननगर जांभूळवाडी रोड कात्रज ) असल्याचे कळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एम एच १२ ओ डब्ल्यू ७१७२ या क्रमांकाच्या डंपरने रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ महिलेला जोरात धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटना घडल्यानंतर नगरसेविका अल्पना गणेश वरपे यांच्याकडून संबंधित घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली.

वरपे म्हणाल्या की, या ठिकाणी तीव्र उतार आहे. वाहनांचा वेग नियंत्रित रहावा व पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पेडिग्रीडी मार्ग आहेत पण या रस्त्यावरून वेगाने डंपरची ये जा चालू असते. अशा प्रकारांमुळे निष्पाप लोकांचा जीव जात आहे. पोलीस प्रशासनाने या संबंधात डंपर मालकांना योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी वरपे यांनी केली आहे.









