वाहतूक विभागातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे वारजे माळवाडी परीसरात वाहतूक समस्या ; कर्मचारी संख्या वाढवण्याची दिपाली धुमाळ यांची मागणी..

वारजे : वारजे माळवाडी परिसराची लोकसंख्या मोठ्याप्रमाणावर वाढली असून या परिसराला लागून असणाऱ्या शिवणे उत्तमनगर हा भाग ही विस्ताराला आहे त्यामुळेच या परिसरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या वाहनांची संख्या वाढली असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. वारजे वाहतूक विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने ही रोज निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडवणे त्यांना अशक्य होत आहे. त्यामुळे वाहतूक विभागात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.
धुमाळ यांनी या संदर्भातील मागणीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांना दिले आहे.
धुमाळ यांनी सांगितले की, पुणे शहरातील वारजे वाहतूक विभागात असणाऱ्या अपुऱ्या मुनष्यबळामुळे वारजे माळवाडी परिसरात मोठी गैरसोय होत आहे. किमान ६० कर्मचाऱ्यांची याठिकाणी आवश्यकता आहे. इतर वाहतुक विभागाच्या क्षेत्रात एक पोलीस स्टेशन असताना देखील तेथील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. परंतु वारजे वाहतूक विभागाच्या अंतर्गत वारजे पोलीस स्टेशन आणि उत्तमनगर पोलीस स्टेशन असे 2 पोलीस स्टेशन असूनही त्यामानाने कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे.

वारजे माळवाडीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून शिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंढवे धावडे हे सुद्धा वारजे वाहतूक विभागामध्ये आले असून आता वारजे वाहतूक हद्द कोंढवे धावडे ते वनदेवी राजाराम पूल चांदणी चौक अशी आहे. येथील वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची गरज आहे. परंतु वारजे वाहतूक पोलिसांचे संख्याबळ केवळ २७ एवढीच आहे. ती संख्या किमान ६० पर्यंत केली तरच वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे सोयीस्कर होणार असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.
वारजे परिसरातून गेलेल्या मुंबई बंगलोर महामार्गावर एखादी अपघाताची घटना घडल्यानंतर किंवा वाहने बंद पडल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी, चांदणी चौकातील पुलाचे काम सुरू असल्याने निर्माण होणारी कोंडी, किरकटवाडी येथील डायव्हरजण अशा अनेक कारणांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.
तसेच वारजेतील माई मंगेशकर चौक, शिंदे पूल चौक, वारजे हायवे चौक,सह्याद्री शाळे समोरील चौक, वारजे माळवाडी बस स्टॉप, नवभारत हायस्कूलचा चौक,
वारजे चौक ते गणपती माथा अरुंद रस्ता आहे. ही या परिसरातील नियमित वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे आहेत. या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांना यातून सुटका हवी आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी तातडीने
वाहतूक पोलीस शाखेच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी व तसे आदेश संबंधितांना द्यावेत असे अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.



