महाराष्ट्र

आरेचा आग्रह रेटून पर्यावरणाला हानी पोहोचवू नका, उद्धव ठाकरेंचं शिंदे, फडणवीसांना आवाहन

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना भवनात पत्रकारांशी संवाद साधताना माझ्यावरील राग माझ्या मुंबईवर काढू नका, असे आवाहन केले आहे. आरेचा आग्रह रेटून पर्यावरणाला हानी पोहोचवू नका, असं त्यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

बर्‍याच दिवसांनी पत्रकारांना फेस टु फेस भेटतोय. नवीन सरकारचे अभिनंदन आणि या सरकारकडुन महाराष्ट्राचे भले व्हावे ही इच्छा!, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांनी हे सरकार स्थापन केले त्यांच्या मते त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. हेच तर मी सांगत होतो, जर हे पूर्वीच केलं असतं तर आता अडीच वर्षे पूर्ण झाली असती, आणि जे झाले ते सन्मानाने झालं असतं. तेव्हा नकार दिला, आता अस का केलं? शिवसेनेला बाजुला ठेवून शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं होऊ शकत नाही.

पर्यावरणाला हानी पोहोचवू नका

मुंबईकरांच्या वतीने आरेचा आग्रह रेटु नका असं आवाहन करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पर्यावरणाला हानी पोहोचवू नका. तिकडे वन्य जीवन आहे. आरेचा निर्णय बदलल्यामुळे दु:ख झाले, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आता राज्यात आणि केंद्रात तुमचंच सरकार आहे. कांजूरमार्गचा प्रस्ताव दिला होता. ही जमीन मुंबईकरांची आहे. तुम्ही मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका, कांजूरमार्गचा प्रस्ताव कायम ठेवा, मेट्रो अंबरनाथ-बदलापूरपर्यंत नेता येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकशाहीवरचा विश्वास उडेल, अशी परिस्थिती

लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी या चार स्तंभांनी आता पुढे यायला हवे, लोकशाही वाचविण्यासाठी, चारही स्तंभांनी एकत्र यावं, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. लोकशाहीचे धिंडवडे थांबवण्याची गरज आहे, ज्याने मत दिले त्याचा बाजार असा मांडला गेला तर ते चुकीचे आहे. मतदाराचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल, अशी परिस्थिती आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी

अमित शाहांनी शब्द पाळला असता, तर सरकार शानदार असतं. मी महाराष्ट्रातील तमाम जनतेचा ऋणी आहे, अस क्वचितच होत असेल की एखादा माणूस जो अचानक आला तो पद सोडताना लोकांच्या डोळ्यात अश्रू येतात, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये