मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर केमिकल टँकरचा अपघात; काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

खोपोली : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर उलटून महामार्गावर दोन ते तीन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खोपोली हद्दीतील अमृतांजन ब्रिजच्या खाली मुंबईकडे येणारा केमिकल टँकर उलटून झालेल्या अपघातामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे.
केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या दोन मार्गिकांपैकी एका मार्गिकेवर टँकर उलटल्याने ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. आय. आर. बी. यंत्रणा, बोरघाट वाहतुक पोलीस, डेल्टा फोर्स, खोपोली पोलीसांनी मदत कार्य सुरू केले आहे. या अपघातानंतर अमृतांजन ब्रिज ते आडोशी टनेलपर्यंत पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. असं असलं तरी रस्त्यावर पडलेल्या केमिकलवर ग्रीट, माती टाकून धीम्या गतीने मुंबईकडे येणारी वाहतूक सुरू करण्यात यश आलं आहे.




