हत्येचा प्रयत्न प्रकरणात आरोपीने घेतले नितेश राणेंचे नाव

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांच्यासमोर सध्या एक नवी अडचण निर्माण झाली आहे. हत्येचा प्रयत्न झाल्याच्या एका प्रकरणात चौकशी करत असताना आरोपीने नितेश राणे यांचं नाव घेतलं आहे. याप्रकरणी सिंधुदूर्गमधील कणकवली पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. नितेश राणे यांनी यावर शिवसेनेच्या अंतर्गत संघर्षात आपलं नाव घेतलं जात असल्याचा आरोप केला आहे. “कणकवलीबद्दल बोलायचं गेल्यास मी पोलिसांकडे जबाब दिला असून सहकार्य केलं आहे. या केसशी माझा दूरपर्यंत काही संबंध नाही. फक्त शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे या सगळ्या गोष्टी सुरु आहेत.
“एका बाजूला अनिल परब आणि रामदास कदम आणि आमच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत आणि विनायक राऊत यांच्यातील जो संघर्ष आहे त्यातून झालेला हा वाद आहे. यात कोणीतरी हवं आहे म्हणून माझ्यावर टाकलं आहे. पोलिसांनी जी माहिती हवी होती ती मी वकिलामार्फत दिली आहे,” असं नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं.







