कराड नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा रोहिणी उमेश शिंदे यांनी स्वतः कोरोना बाधित मृतांवर केले अंत्यसंस्कार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कौतुकाची थाप
कराड : कोव्हीड-19 च्या सुरुवातीपासून कराड शहरातील प्रत्येक बाधित कुटुंबाची काळजी घेणाऱ्या लोकनियुक्त नगराध्यक्षा रोहिणी उमेश शिंदे यांनी आज कराड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसोबत कोव्हीड स्मशानभूमीत जाऊन 4 रुग्णांच्या मृतदेहांचे अंत्यसंस्कार पार पाडले. सुरुवातीच्या काळापासूनच आपल्या जीवाची पर्वा न करता सौ. रोहिणी जी या स्वतः रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. औषध फवारणी, रुग्णवाहिका, वैद्यकीय सुविधा, रुग्णांना बेड उपलब्ध करून देणं, अशी सर्व प्रकारची कार्य या रणरागिणीने केली. आज करण्यात आलेल्या अंत्यसंस्कारावेळी रोहिणी यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. नगरपरिषद कर्मचारी, अधिकारी यांच्याशी समन्वय साधून त्यांनी या काळात सर्व यंत्रणा कुशलतेने हाताळल्या. याच काळात रोहिणी जी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब कोरोना बाधित झाले. मात्र यातूनही त्या सावरल्या आणि पुन्हा आपल्या समाज कार्यात रुजू झाल्या.
याबाबत रोहिणी शिंदे यांच्या कार्याची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दखल घेत सोशल मिडियावर कौतुकाची पोस्ट केली आहे. पाटील म्हणाले, महिला नगराध्यक्षांनी स्वतः कोव्हीड मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. भाजपाचं घोषवाक्य, ‘प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि नंतर स्वतः’ याचा अवलंब भाजपाचे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने करतात हे रोहिणी शिंदे यांनी सिद्ध केले असून त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. भाजपाने सदैव महिलांना सक्षम करण्यासाठी पुढाकार दिला आहे. देशातील अनेक विरांगनांचा आदर्श घेऊन आज भाजपामधील महिला नेत्या, कार्यकर्त्या समाजकार्यात आपले सर्वस्व अर्पण करतात. भाजपामधील अशा वीर महिलांचा आम्हाला गर्व आहे. कोणत्याही संकटाच्या काळात भाजपाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागरिकांसाठी अहोरात्र जीवाची बाजी लावून कार्य करत असतात. भाजपा अशाप्रकारेच सदैव जनतेच्या मदतीसाठी कार्यतत्पर राहील याची मला खात्री आहे.



