महाराष्ट्र

पायी वारी पालखी सोहळा कार्यक्रम जाहीर या दिवशी होणार माउलींच्या पालखीचे प्रस्थान

पुणे : कोरोनामुळं गेली दोन वर्ष आषाढी पायी वारीच्या सोहळ्यात खंड पडला. मात्र मोजक्या वारकऱ्यांमध्ये परंपरा कायम राखली गेली. पण आता कोरोना आवाक्यात आलाय, म्हणूनच शासनाने सर्व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यंदा पायी वारी निघणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय. वारकरी ही तशा तयारीत आहेत. अशातच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 21 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

पंढरपूरमध्ये एकादशीच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीत पायी वारीचं वेळापत्रक सादर करण्यात आलं. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे. यंदा पालखी सोहळ्यात तिथीची वाढ झाली आहे. त्यामुळे लोणंदमध्ये अडीच दिवस तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी मुक्कामी असेल. दिंडीकऱ्यांच्या मागणीनुसार यंदापासून संस्थानच्या सही शिक्क्यानं वाहन पास दिले जातील, अशीही माहिती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी दिली आहे.

पायी वारी सोहळा कार्यक्रम

मंगळवार दिनांक 21 जून रोजी सायंकाळी 4 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. बुधवार दिनांक 22 आणि गुरुवार दिनांक 23 रोजी पुणे, शुक्रवार दिनांक 24 आणि शनिवार दिनांक 25 रोजी सासवड, रविवार दिनांक 26 रोजी जेजुरी, सोमवार दिनांक 27 रोजी वाल्हे, मंगळवार दिनांक 28 आणि बुधवार दिनांक 29 रोजी लोणंद, गुरुवार दिनांक 30 रोजी तरडगांव, शुक्रवार दिनांक 1 आणि शनिवार दिनांक 2 जुलै रोजी फलटण, रविवार दिनांक 3 रोजी बरड, सोमवार दिनांक 4 रोजी नातेपुते, मंगळवार दिनांक 5 रोजी माळशिरस, बुधवार दिनांक 6 रोजी वेळापूर, गुरुवार दिनांक 7 रोजी भंडीशेगाव, शुक्रवार दिनांक 8 रोजी वाखरी तर शनिवार दिनांक 9 रोजी श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी सोहळा पोहोचेल. रविवार दिनांक 10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर आणि इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा आणि बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे.

Img 20220414 wa0001


पालखी सोहळ्यातील अवांतर गर्दी कमी करण्यासाठी ज्यांच्याकडे पास नाही अशी वाहने वारीत सोडू नयेत. याबाबत पोलिसांना माहिती द्यावी. वाहनांना पास देताना पूर्वी दिंडीकऱ्यांची अडवणूक होत होती. ती अडवणूक थांबविण्यासाठी वाहनांचे पास हे  संस्थानच्या सहीनं द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. त्यास सर्व दिंडीप्रमुखांनी टाळ्यांच्या गजरात पाठींबा दिला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम सोहळ्यापुर्वी पूर्ण व्हावे. सासवड येथील पुलाच्या कामासाठी 6 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. परंतु हे काम अद्याप सुरु नाही. जेजुरीला नवीन तळासाठी 9 एकर जागा शासनानं उपलब्ध करुन दिली आहे. तिचा ताबा मिळावा. पालखी सोहळ्यापुर्वी पालखी तळ सुसज्ज व्हावेत. रस्ता रुंदीकरणामध्ये अनेक दिंड्यांच्या दुपारच्या जेवणाच्या आणि मुक्कामाच्या जागा बदलल्या आहेत. पोलिसांना माहिती नसते. ते गाड्या लावू देत नाहीत. त्यासाठी पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी. राष्ट्रीय महामार्गावर रस्ता दुभाजक अखंड असल्यानं पालखी सोहळ्याची वाहनं उजवीकडून डावीकडे येण्यास अडचण निर्माण होणार आहे. त्यासाठी नियोजन व्हावे. पालखी महामार्गावरील मद्यपानाची दुकानं रस्त्यापासून 500 ते 700 मीटर अंतर दूरवर असावीत. पालखी तळासाठी 25 एकर जागा आरक्षित ठेवावी. कुंभमेळ्याच्या धर्तीवर पालखी तळासाठी जागा आरक्षित ठेवावी. माळशिरसला गंगूकाका शिरवळकर यांची समाधी गायब झाली आहे. तर वेळापुरचा धावाच नष्ट झाला आहे. वेळापूर येथील मानाच्या भारुडासाठी जागा उपलब्ध करावी. अशा विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले, त्यावर तोडगा काढला जाणार आहे.

Fb img 1648963058213
Img 20220414 130128 501

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये