मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपिठाचे सर्किट बेंच पुण्यात स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार : चंद्रकांत मोकाटे

वकिलांच्या स्नेह मेळाव्यात वकिलांनी मांडले आपले प्रश्न… चंद्रकांत मोकाटे यांनी दिले आश्वासन
पुणे : मुंबई उच्चं न्यायालयाचे खंडपिठाचे सर्किट बेंच पुण्यात स्थापन करण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिकरित्या प्रयत्न करू असे आवाहन कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी बुधवारी सायंकाळी एका मेळाव्यात केले.
ॲड. राजेंद्र देशमुख व डॉ. रविकिरण शाह यांनी बुधवारी आयोजित केलेल्या वकील आणि डॉक्टर यांच्या मेळाव्यात चंद्रकांत मोकाटे बोलत होते. या मेळाव्यात अनेक वकिलांनी सर्किट बेंचविषयी मागणी आपल्या मनोगतमध्ये केली. त्यावेळी चंद्रकांत मोकाटे त्यांच्याशी संवाद साधताना म्हणाले की, हायकोर्टाचे सर्किट बेंच पुण्यातील न्यायालयात सुरु करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या प्रयत्न केले पाहिजेत. माझ्यासहित सर्वांनी केंद्र व राज्यसरकार, गृहखाते व अन्य संबधितांशी पाठपुरावा करून सर्किट बेंच सुरु करण्यासाठी प्रयत्न करू.

ज्येष्ठ वकील ॲड. भगवानराव साळुंखे म्हणाले की, पुण्यात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरु करावेत. नवोदित वकिलांना राज्य व केंद्र सरकारने मानधन सुरु करावेत. वकिली व्यवसाय करणाऱ्या नवीन वकिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. या मुलांसाठी योग्य गोष्टी कराव्यात.
ॲड. लक्ष्मण राणे यांनी आपल्या भाषणात मागणी केली की, वकिलांना त्यांच्या जीवाची भिती असते. त्यांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी कायदा करण्यात यावा.
ॲड. मोनिका वाईकर यांनी सांगितलं की महिलां वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकवेळा उपस्थित होतो त्यांनाही संरक्षण देण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. चंद्रकांत मोकाटे यांनी वकिलांच्या मागण्या ऐकून घेतल्या व त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
यावेळी ॲड. राजेंद्र देशमुख यांनी आपले प्रश्न. सोडवायचे असतील तर चंद्रकांत मोकाटे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.









