युपीची निवडणूक पुढे ढकला, प्रचार सभांवर बंदी घाला : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा सल्ला

सिंहासन न्यूज नेटवर्क : ओमायक्रॉनचे संकट लक्षात घेता उत्तर प्रदेश निवडणूक पुढे ढकलली जावी असा सल्ला अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही राज्यात निवडणुकीसंबंधी प्रचारसभांवर बंदी घालण्याची आणि ओमायक्रानचे रुग्ण वाढत असल्याने निवडणूक काही काळासाठी पुढे ढकलण्यासंबंधी विचार करण्याची विनंती केली आहे. याच्याशी संबंधित नसणाऱ्या एका जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं आहे.
“जर सभावंर बंदी आणली नाही, तर दुसऱ्या लाटेपेक्षाही वाईट परिणाम दिसू शकतात,” असे न्यायमूर्ती शेखर यादव यांनी यावेळी सांगितले. तसेच आयुष्य असेल तरच जग आहे असेही म्हटले आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे न्यायमूर्तींनी यावेळी सांगितले.
न्यायालयात रोज शंभरहून अधिक केसेसवर सुनावणी होत असून यामुळे मोठी गर्दी होत आहे, तसेच कोविड-19 नियमांचे पालन केले जात नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.




