जगातलं सर्वात श्रेष्ठ तीर्थ म्हणजे माय आणि बाप.. रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले..

बावधन : जगातलं सर्वात श्रेष्ठ तीर्थ माय आणि बाप आहेत यापेक्षा श्रेष्ठ तीर्थ कोणतेही नाही हे सांगत असताना रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी बापाच्या त्यागाचे, कष्टाचे, समर्पणाचे केलेले वर्णन आणि दिलेले उदाहरणे ऐकून उपस्थित माता भगिनीच नाही तर पुरुष मंडळींचेही डोळे पाणावले.
बावधन बुद्रुक मध्ये वडील स्वर्गीय ज्ञानोबा बाबुराव दगडे पाटील (मुकादम) यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त बापूसाहेब ज्ञानोबा दगडे पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवात पहिल्या दिवशी रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक (नागपूर)Ramayanacharya Ramrao Maharaj Dhok यांचे कीर्तन पार पडले. आपल्या हृदयस्पर्शी आणि भावूक कीर्तनाने त्यांनी श्रोत्यांना भारावून टाकले.

ह.भ.प. रामराव महाराज ढोक म्हणताय मायबापे केवळ काशी | तेणे न व्हावे तीर्थासी ||१|| पुंडलिके काय केले?| परब्रम्ह उभे ठेले ||२|| तैसा होई सावध | हृदयीं धरी नारायण ||३|| तुका म्हणे मायबापे | अवघी देवाची सर्व रूपे ||४|| ३८ वर्ष स्वर्गीय ज्ञानोबा बाबुराव दगडे पाटील यांची दृष्टी गेली होती, त्या काळात एखाद्या काचेच्या भांड्याला सांभाळावं तशी त्यांची सेवा त्यांचा मुलगा बापूसाहेब आणि दोन मुली आशाताई नवले व उषाताई इंगवले व बापूसाहेबांची पत्नी विमलताई यांनी केली. जगातलं सर्वात श्रेष्ठ तीर्थ माय आणि बाप आहेत यापेक्षा श्रेष्ठ तीर्थ कोणतेही नाही हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे.
आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या कीर्तन महोत्सवाचे अतिशय उत्तम नियोजन बापूसाहेब दगडे पाटील यांनी केल आहे. ज्यावेळी या मंडपात पाऊल टाकलं त्यावेळी असं वाटलं की श्रीकृष्णाच्या द्वारकेत प्रवेश झाला आहे. सुंदर आणि भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे.
वडिलांची महती विशद करणारी अनेक उदाहरणे आपल्या कीर्तनातून ढोक महाराजांनी दिली. वडील तोंडाने आशीर्वाद देत नसले तरी ते मनापासून तुम्ही आयुष्यभर सुखी राहो यासाठी प्रार्थना करत असतात. आई कौतुकाचं पात्र आहे,कौतुक झालंचं पाहिजे पण बापाचं काय? बापाचं प्रेम कुठे कमी आहे, आई पेक्षा कणभर जास्तच प्रेम जन्मदात्या बापाचा असतं. येथे बसलेल्या माता-भगिनींना राग येईल पण त्यांनी डोळे बंद करून प्रत्येकाने आप आपला बाप आठवावा मग कळेल बाप काय असतो ते.. एकुलत्या एक मुलाच्या मरणानं न रडणारा बाप सापडल पण मुलगी सासरी जाताना न रडणारा बाप सापडणार नाही. मुलगी सासरला जात असताना आयाबाया रडत असतात पण बाप कुठेतरी एका कोपऱ्यात मुलीला वाढवतानाच्या आठवणीत व्याकुळ होऊन रडत बसलेला असतो. तो कोणाला दिसत नाही. किरकोळ संकटात तुम्हाला आई आठवेल पण भयानक संकटात तुम्हाला बापच आठवतो. आईच प्रेम समाज पाहतो पण बापाचं प्रेम लपून आहे. एवढाच काय फरक आहे.



कृष्ण जन्म आठवा वासुदेवान त्याला वाचवण्यासाठी पार केलेली यमुना, माय कौसल्या आणि दशरथ आठवा यातून बापाचं प्रेम कसं असतं हे कळेल. जोपर्यंत वडील असतात तोपर्यंत घर वजनदार असतं. मुलगी माहेराला आल्यावर तिचा आनंद कशात असतो तर तो बापाच्या भेटीमध्ये असतो.
यावेळी महाराजांनी मनातील भावामध्ये आणि नामस्मरणात किती ताकद असते हे सांगितले. कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली आहे त्याला विचारा, बाळाच मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, भक्तीची मस्ती संतांना विचारा आणि शक्तीची मस्ती पैलवानाला विचारा..काळाचा मालक हरी आहे आणि हरीची कृपा झाल्यावर काळाची भीती वाटत नाही असं ते म्हणाले.
आजचे कीर्तन
आज रविवार दिनांक १४ सप्टेंबर : प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) सायंकाळी ६.३०. ते ८.३० बावधन बुद्रुक, तलाठी कार्यालयासमोरील मैदान









