‘आयुष्यावर बोलू काही’ हे सादरीकरण म्हणजे सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान : पृथ्वीराज सुतार
‘आयुष्यावर बोलू काही’ या कलाकृतीला २१ वर्षे पूर्ण
सलग ६ तास रंगला ‘आयुष्यावर बोलू काही’ चा विशेष कार्यक्रम
पुणे – ‘कवी, गीतकार संदीप खरे आणि संगीतकार, गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी ‘आयुष्यावर बोलू काही’ या सादरीकरणाच्या रूपाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात सोनेरी पान लिहिले आहे’, असे उद्गार शिवसेना नेते आणि माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी शनिवारी येथे काढले.
संदीप खरे आणि डॉ. सलील कुलकर्णी यांच्या कविता, गाणी, गप्पांच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या सादरीकरणाला नुकतीच २१ वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून संयोजक सत्यजीत धांडेकर यांच्या वतीने ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाच्या संपूर्ण चमूचा विशेष सत्कार यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी करण्यात आला. शिवसेनेचे नेते आणि नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते कवी, गीतकार संदीप खरे आणि संगीतकार, गायक डॉ. सलील कुलकर्णी, युवा गायक शुभंकर कुलकर्णी, वादक कलाकार आदित्य आठल्ये (तबला), रितेश ओहाळ (गिटार), अभय इंगळे (र्हिदम मशीन, आक्टोपड) यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे ‘आयुष्यावर बोलू काही’ या सादरीकरणासाठी पडद्यामागे परिश्रम करणाऱ्या दीपक गुप्ते, गणेश भोसले, श्रद्धा हंपी यांचा संयोजक सत्यजीत धांडेकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सुतार म्हणाले, ‘संदीप आणि सलील तसेच त्यांचे सहकलाकार यांनी गेल्या २१ वर्षांपासून आयुष्यावर बोलू काही या सादरीकरणात सातत्य राखले आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण, मांडणी त्यांनी अतिशय कल्पकतेने केली आहे. या कार्यक्रमाची ५० वर्षेही साजरी व्हावीत, अशा शुभेच्छा मी देतो’.
मेघराज राजे भोसले म्हणाले, ‘एखादी कलाकृती सलग २१ वर्षे सादर होते, तिला सातत्याने प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळतो, ही किमया पुणेकर कलाकार संदीप खरे आणि डॉ. सलील कुलकर्णी यांनी करून दाखवली आहे, याचा पुणेकर म्हणून अभिमान वाटतो. या सादरीकरणाने राज्य, राष्ट्र आणि जागतिक स्तरावर रसिकांची दाद मिळवली आहे. यापुढेही या कलाकारांकडून अशाच उत्तम कलाकृती निर्माण होवोत, अशा शुभेच्छा व्यक्त करतो’.
रत्ना दहिवेलकर यांनी सूत्रसंचालन केले. २१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त यावेळी ‘आयुष्यावर बोलू काही’ या सादरीकरणाचा ६ तासांचा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. रसिकांच्या प्रतिसादाने हा प्रयोग उत्तरोत्तर रंगत गेला.