सातारा जिल्ह्याची परिस्थिती गंभीर- देवेंद्र फडणवीस

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून येथील सरकारी रुग्णालयाची अवस्था गंभीर आहे. क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण या रुग्णालयात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी स्टेडियम वरती कोविड सेंटर उभा करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे, परंतु अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही.त्यामुळे लवकर या प्रस्तावाला मान्यता देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस यांनी कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. आज त्यांनी सातारा व कराड येथे भेट दिली. सातारा जिल्ह्यात रुग्ण वाढत असून कराड हॉटस्पॉट बनल आहे.त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणा उभारण्याची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
कराड येथील कृष्णा हॉस्पिटल कोविड सेंटरला फडणवीस यांनी भेट दिली आणि डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, कृष्णा हॉस्पीटल मध्ये १४०० रूग्णांवर उपचार करून ते बरे झाले आहेत. हजारावर रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अशा रुग्णालयांना सरकारचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. या काळात राज्य सरकारच्या वतीने अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
राज्य सरकार म्हणते की, महात्मा फुले जनारोग्य योजनेत सर्व रूग्णांना मदत दिली जाते. पण, कृष्णा हॉस्पिटलमध्ये १४०० रूग्णांवर उपचार केलेले असताना केवळ ५५ हजार रूपये त्यांना मिळाले. अशीच स्थिती राज्यातील जवळपास सर्वच रूग्णालयात आहे. राज्यात केवळ ९ हजार केसेसच्या बाबतीत निर्णय झाले आहेत. चार-पाच महिने जर त्यावर निर्णय होत नसतील, तर त्याचा अतिशय गंभीर परिणाम रूग्णसेवेवर होतो आहे. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.



