शारीरिक श्रम आणि बौद्धिक श्रम यातील आर्थिक विषमतेची दरी दूर झाली पाहिजे :डॉ.श्रीपाल सबनीस

पुणे- : महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पुणे आणि कमिन्स मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कमिन्स एम्प्लॉईज युनियन सभागृह डहाणूकर कोथरूड येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा कामगार भूषण पुरस्कारप्राप्त राजेंद्र वाघ तसेच गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेले कामगार संजीव माने, दिलीप पासलकर यांचा जाहीर सत्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी दिलीप बराटे, कामगार नेते शिवाजीराव खटकाळे, बाबा धुमाळ, महेंद्र बालवडकर, राजेंद्र कुलकर्णी, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे पिंपरी विभाग प्रमुख सुरेश कंक, वि.दा. पिंगळे, दादासाहेब कोरेकर, किरण गहेरवार, भरत भेगडे हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘विचार श्रमापेक्षा शारीरिक श्रम हे आधिक निर्णायक आहे. बुद्धीच्या श्रमाला श्रेष्ठत्व दिले जाते. कामाच्या तुलनेत श्रमिकांना मिळणारा मोबदला अत्यल्प दिला जातो. शारीरिक श्रम आणि बौद्धिक श्रम करणाऱ्या कामगारांच्या मध्ये आर्थिक विषमतेची भली मोठी दरी आहे. ही विषमता दूर करण्यासाठी समाजाने पाऊले उचलायला हवीत, कारण श्रमाच्या घामात एक विलक्षण कलात्मकता आहे. असे परखड विचार सबनीस यांनी मांडले.
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन बाळकृष्ण नेहरकर यांनी केले तर आभार बापूसाहेब सरोदे यांनी मानले. गुणवंत कामगार सत्कार सोहळ्याला परिसरातील असंख्य श्रमिक कामगार उपस्थित होते. राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.







