राष्ट्रीय
उत्तर प्रदेश: राज्यसभेच्या दहा जागा बिनविरोध

लखनौ: उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या दहा जागांवर बिनविरोध निवड झाली आहे.
या नवनिर्वाचित खासदारांमध्ये भाजपचे आठ, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचे प्रत्येकी एक आहेत. उमेदवारी अर्ज माघारीसाठी सोमवारी शेवटची मुदत होती. यामध्ये केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांचा समावेश आहे.

समाजवादी पार्टीचे प्राध्यापक राम गोपाल यादव हे तिसऱ्यांदा राज्यसभेवर जात आहेत आणि बसपाचे रामजी गौतम प्रथमच संसदेत प्रवेश करणार आहेत. राज्यसभा सदस्यत्वासाठी ३१ खासदारांचा कोटा उत्तर प्रदेशच्या वाट्याला आला असून त्यात भाजपचे २२ खासदार आहेत. समाजवादी पार्टीचे पाच, बसपाचे तीन खासदार आहेत आणि काँग्रेसच्या वाट्याला एकच खासदार आहे. नव्या खासदारांची मुदत २०२६पर्यंत आहे.






