पुणेकरांनो, तुमच्यासाठी शब्दही अपुरे पडतील ! मुरलीधर मोहोळ पुणेकरांसाठी भावनिक..

पुणे : खासदार झाल्यानंतर दिल्लीला गेलेले मुरलीधर मोहोळ केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री होऊनच आज पुण्यात दाखल झाले. दिल्लीला दोन्ही खात्यांचा पदभार स्वीकारल्या नंतर, कामांची माहिती घेऊन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबर पुण्यातील प्रश्नांवर चर्चा करून ते आज पुण्याकडे निघाले. दिल्लीत सर्व शासकीय प्रक्रिया पार पाडण्यात बरेच दिवस गेले. त्यामुळे त्यांचे पुण्यातील समर्थक अण्णा पुण्यात कधी येणार याची वाट पाहत होते. पुण्याला केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने साहजिक ही पुणेकरांसाठी अभिमानाची बाब होती, त्यामुळे पुणेकरांनाही त्यांना भेटण्याची आतुरता लागली होती. आज अण्णा पुण्यात आले आणि त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. केंद्रात मंत्री पद मिळाल्यानंतर प्रथमच पुण्यात येताना मनात निर्माण झालेल्या भावना मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये व्यक्त केल्या आहेत.
मुरलीधर मोहोळ आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात
आजवर कित्येकदा पुणे विमानतळावरून दिल्लीला गेलो असेल. कितीदा तरी याच विमानतळावर उतरून घरीही गेलो असेल. आजचा दिवस मात्र भारावून टाकणारा होता. सकाळीच दिल्लीला विमानात बसलो, तेव्हाच मनात असंख्य वेगळ्या भावना दाटून आल्या.

पुणेकरांच्या अलोट प्रेमानं माझ्यासारख्या सामान्य माणसाला संसदेत पाठवलं आणि याच मतदारांच्या आशीर्वादानं पहिल्याच प्रयत्नात मंत्रीही केलं. याच मंत्रिपदासह आज आपण पुण्याला निघालो आहोत, या भावना मनात गर्दी करीत होत्या. त्याच भावना घेऊन पुण्यात विमानतळावर उतरलो अन् बाहेर येताच स्वागतासाठी जमलेली सारी गर्दी पाहून भारावून गेलो!
माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाशजी जावडेकर, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दीपकभाऊ मानकर, शिवसेनेचे नाना भानगिरे यांच्यासह पार्टीतील माझे सहकारी, असंख्य कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. याचा मनस्वी आनंद आहे. समोर भाजपचे असंख्य कार्यकर्ते, आपल्यावर प्रेम करणारी तरुणाई, आपल्याला सतत पुढं ठेवू पाहणारी जिवाभावाची माणसं… या साऱ्यांचं स्वागत स्विकारताना गहिवरून आलं. विमानतळ प्रशासन आणि जिल्हा प्रशासनानंही स्वागत केलं.




































