कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनाचा कोणता उमेदवार येणार निवडणुकीच्या आखाड्यात…

कोथरूड : कोथरूड विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही भाजप विरुध्द शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे अशी असणार आहे. भाजपने या मतदार संघात पुन्हा भाजप नेते, आमदार चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पाटील यांच्यासमोर ठाकरे शिवसेना आता कोणता आपला शिलेदार उमेदवार म्हणून देणार याकडे आता लक्ष लागले आहे.

शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि महापालिकेतील गटनेते, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार हे दोघे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून दोघांचेही उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत, चंद्रकांत मोकाटे कोथरूड चे आमदार राहिलेले आहेत, त्यांना निवडणुकीचा अनुभव आह तर पृथ्वीराज सुतार हे माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे पुत्र आहेत. शशिकांत सुतार यांना मानणारा वर्ग कोथरूड मध्ये मोठा आहे. पृथ्वीराज सुतार यांनी नगरसेवक व शिवसेना गटनेते म्हणून केलेलं काम व वडिलांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या समोर चंद्रकांत मोकाटे येणार की पृथ्वीराज सुतार हे लवकरच स्पष्ट होईल. चंद्रकांत दादा विरुध्द चंद्रकांत काका की चंद्रकांत दादा विरुध्द पृथ्वीराज दादा कशी लढत होणार हे आता याबाबत उत्सुकता ताणली गेलेली आहे.



चंद्रकांत मोकाटे व पृथ्वीराज सुतार या दोघांचीही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून गाठीभेटी, मेळावे यातून त्यांनी आतापर्यंत मतदारांशी संपर्क साधलेला आहे. या मतदार संघात भाजपने उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे. जागा वाटपात कोणताही तिढा महाविकास आघाडीत या मतदारसंघाबाबत नसल्याने येथील शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार कधी जाहीर होणार हे आता पहावे लागणार आहे.
भाजप व शिवसेना अशी थेट लढत या मतदार संघात झाल्यास चुरशीचा सामना या मतदार संघात पहायला मिळणार आहे. आता पर्यंत झालेल्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत या मतदार संघात भाजपच मताधिक्य कमी जास्त झालेलं आहे. मागील विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील हे २५ हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यावेळी पाटील व किशोर शिंदे यांच्यात सरळ लढत झाली होती व काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने शिंदे यांना पाठिंबा दिला होता तर शिवसेना भाजप बरोबर होती. बाहेरचा उमेदवार असा चंद्रकांत पाटील यांचा झालेला प्रचार आणि शिंदे यांना आघाडीने दिलेल्या पाठिंब्यामुळे ही लढत उत्कंठा वर्धक झाली होती. जातीय समीकरणाचा फायदाही काही अंशी पाटील यांना झाला होता. या निवडणुकीत शिवसेना भाजप बरोबर नसती तर काय झाले असते याबाबतची चर्चा त्यानंतर कायम होत आली आहे.
शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या चंद्रकांत मोकाटे व पृथ्वीराज सुतार यांचा मतदार संघात सर्वच भागात जनसंपर्क असून वैयक्तिक ओळखीही जास्त आहेत. दोघांचे मतदार संघात नातेगोतेही मोठे आहे. प्रत्येक भागातील की वोटर त्यांना माहीत आहे. अनेक वर्षांचा सोसायटी व वस्ती भागात वैयक्तिक जनसंपर्क आहे. त्याचा फायदा त्यांना चांगला मिळू शकतो. त्यामुळे उध्दव ठाकरे या मतदार संघात कोणावर विश्वास दाखवणार हे लवकरच कळेल.
चंद्रकांत पाटील यांनी गेल्या पाच वर्षात विविध उपक्रमांतून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी कोथरूड करांना किती आपले केले हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.









