पुणे शहर

खडकवासला मतदार संघात भाजपचे भीमराव तापकीर यांचं पारडं जड ; पण तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार ?

खडकवासला विधानसभा मतदार संघातून महायुतीचे भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. लोकसभा निवडणुकीतही महायुतीच्या उमेदवाराला या मतदार संघातून मताधिक्य मिळालेले आहे. त्यामुळे या मतदार संघात तापकीर यांचे पारडे जड असल्याचे सध्या बोलले जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उमेदवार सचिन दोडके व मनसेचे उमेदवार मयुरेश वांजळे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे.

खडकवासला विधानसभा मतदार संघात पुण्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागाचा समावेश आहे. या मतदार संघाची निवडणूक कायमच चर्चेची आणि लक्षवेधक ठरलेली आहे. या मतदार संघात असलेले प्रत्येक पक्षाचे मातब्बर नेते कोणाची साथ देतात यावर येथील राजकीय गणिते अवलंबून राहिलेली आहेत. नेत्यांच्या नाराजीचा फटका उमेदवारांना बसत आलेला आहे.

Img 20241020 wa0001435697684176070576

या मतदार संघात येत असलेल्या शहरी भागात भाजप बहुल मतदार जास्त असून ग्रामीण भागात संमिश्र मतदार आहे त्यामुळे याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होत आला आहे. भाजपचे उमेदवार असलेले भीमराव तापकीर या मतदार संघातून तीन वेळा निवडून आले असून शांत व संयमी स्वभाव, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या वृत्ती अशी त्यांची प्रतिमा असून ती मतदारांना भावत आली आहे. भाजपचा मतदार त्यांच्या पाठीशी आहेच पण मतदार संघातील शहरी व ग्रामीण भागात असलेलं नातंगोतं, वैयक्तिक जनसंपर्क व केलेली विकास कामे ही त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सचिन दोडके यांनी भीमराव तापकीर यांना चांगली लढत दिली होती. पण तापकीर यांनी दोडके यांच्यावर मात करत विजय संपादित केला होता. आता सचिन दोडके शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार आहेत. दोडके यांना मागील निवडणुकीचा अनुभव आहे तशी त्यांनी रणनीती आखली असणार आहे. परंतु राष्ट्रवादीत दोन गट झाल्याने अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीत आहे, त्यामुळे त्यांची साथ भाजपला असणार आहे. त्याचा फटका दोडके यांना बसू शकतो. सचिन दोडके मतदार संघात कायम चर्चेत आहेत.  त्याचा त्यांना कसा फायदा होतो हे मतदानातून कळेल.

मनसेचे उमेदवार मयुरेश वांजळे हे खडकवासला मतदार संघाचे मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी मतदार संघात चांगले वातावरण निर्माण केले आहे. आधीपासूनच त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केल्याने त्यांचे नाव चांगले चर्चेत आले आहे. तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून त्यांनी निवडणुकीतील रंगत वाढवली आहे. माजी आमदार कै. रमेश वांजळे यांना मानणारा वर्ग खडकवासला मतदार संघात आहे त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत मिळू शकतो.

एकूणच खडकवासला मतदार संघात तीन वेळा आमदार असलेल्या भाजपच्या भीमराव तापकीर यांची बाजू सरस दिसत आहे. मात्र राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे सचिन दोडके व मनसेचे मयुरेश वांजळे त्यांच्या समोर आहेत त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबतची उत्सुकता सर्वांना आहे.

Img 20240404 wa0016281297658999536660438617
Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये