पुणे शहर

कोथरूडमधील भुसारी कॉलनीतील त्या इमारतीच्या कामाला स्थगिती.. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर कठोर कारवाई होणार का ?

कोथरूड : डाव्या भुसारी कॉलनीत निष्काळजीपणे इमारत पाडताना आजुबाजूच्या इमारतींना धोका निर्माण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर पुणे महापालिका बांधकाम विभागाकडून कडक कारवाई कधी होणार असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. सध्या या बांधकामाच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना महापालिका प्रशासन चौकशी आणि तपास याचे कारण देऊन बांधकाम व्यावसायिकाला पाठीशी घालणार अशी चर्चा मात्र सुरू झाली आहे.

शनिवार दिनांक १४ जून रोजी कोथरूड मधील डाव्या भुसारी कॉलनीत शुभंकर सोसायटीची इमारत पुनर्विकासासाठी पडण्यात येत होती, मात्र इमारत चुकीच्या पद्धतीने पाडली जात असल्याने ती एका बाजूला कलंडली त्यामुळे बाजूच्या तीन इमारतींना धोका निर्माण झाल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. पाडण्यात येणारी इमारत एका बाजूला कलंडल्याने ती पूर्ण पडेपर्यंत बाजूच्या सोसायटीतील नागरिकांचा जीव टांगणीला लागला होता. हा प्रकार म्हणजे संबंधित बांधकाम व्यावसायिक व पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणाचे मोठे उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978

शनिवारी शुभंकर सोसायटीची इमारत पाडताना कलंडली आणि एकच धावाधाव सुरू झाली. माजी नगरसेविका अल्पना वरपे,  गणेश वरपे, मनसेचे प्रशांत कनोजिया यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून फोनाफोनी केली आणि प्रशासनाचे पाचारण झाले. अग्निशमन दल, महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांनीही घटनास्थळी धाव घेतली, कारण झालेला प्रकार हा भयानक होता आणि गंभीर दुर्घटनेला आमंत्रण देणारा होता हे सगळ्यांच्या ध्यानात आले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्वांनीच यंत्रणा हलवली. रात्री उशीरा शुभंकर सोसायटीची इमारत प्रयत्न करून पाडली गेली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. या चुकीच्या प्रकाराबाबत शिवतीर्थ, कलाग्राम या दोन्ही सोसायट्यांनी पोलिसांकडे तक्रारी दिलेल्या आहेत.

या घटनेच्या निमित्ताने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. बिल्डिंग पडण्यासाठी परवानगी देताना बांधकाम विभागाकडून काही नियम देण्यात येतात. पण हे काम करत असताना या नियमांचे पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी अधिकारी आले होते का ? बांधकाम पडण्यासाठी कोणाला देताना त्यांचा इमारत पाडण्याच्या कामाचा अनुभव पहिला जातो का ?  कोण्या नवख्या माणसाला इमारत पाडण्याचे काम देऊन नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार बांधकाम व्यासायिकाला कोणी दिला आहे ? अशा पद्धतीने नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर कारवाई संदर्भात महापालिकेच्या नियमावलीत कठोर कारवाई नाही का ?

या संदर्भात महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे.बी.पवार यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही संबंधित बांधकामाला स्टॉप वर्क ऑर्डर दिलेली आहे, तसेच पोलिसांकडे तक्रार दिली असून तपास करून योग्य कारवाई करावी असे सांगितले आहे. बांधकाम विभागाकडूनही तपास व चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये