शहरातील ५ हजार रेस्टॉरंटस् अजूनही बंदच

पुणे : शहर आणि परिसरातील पाच हजारांवर हॉटेल, रेस्टॉरंटस सात महिन्यानंतरही बंद आहेत. हॉटेल सुरू करण्यास परवानगी असली सध्याच्या परिस्थितीत हॉटेल चालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटचा व्यवसाय सुधारण्यास आणखी दोन महिने तरी लागतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
देशव्यापी लॉकडाऊन मार्च महिन्यात लागू झाला. तेव्हापासून हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसाय बंद होता. आता हा व्यवसाय करण्यास परवानगी असली तरी या व्यवसायातील मंदी आणखी काही काळ हटणार नाही असे दिसत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथील करताना पार्सल सर्व्हीस, त्यानंतर सकाळी आठ ते सायंकाळी साडेसात अशी व्यवसायास परवानगी देण्यात आली. अलिकडे रेस्टॉरंटच्या वेळा रात्री साडेअकरा वाजेपर्यंत वाढवून देण्यात आल्या आहेत. मात्र व्यवसाय वीस टक्क्यांच्या आसपास होत असल्याचे रेस्टॉरंट चालकांकडून सांगण्यात येत आहे.

परराज्यात गेलेले कामगार अद्यापी परतलेले नाहीत. पश्चिम बंगाल, बिहारमधून येणाऱ्या रेल्वेगाड्यांचे दोन महिन्यांचे बुकींग झालेले आहे. रेल्वे वाहतूक सुधारल्याशिवाय कामगार मिळू शकणार नाहीत, अशी सध्याची स्थिती आहे. सध्या क्षमतेच्या ५० टक्के व्यवसायास परवानगी आहे. तेवढाही ग्राहक मिळत नाही.. फॅमिली ग्राहकाने रेस्टॉरंटकडे पाठ वळविली असल्याचे दिसत आहे. अशा अडचणी असल्याने शहरातील सुमारे पाच हजार मालकांनी अजूनही रेस्टॉरंट बंद ठेवलेली आहेत. या व्यवसायावर अनेक रोजगार अवलंबून आहेत त्यामुळे या व्यवसायाची गाडी लवकर रुळावर येणे आवश्यक आहे.






