महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांकडून सिल्व्हर ओकवर दगडफेक

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन केले आहे. सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानावर या कर्मचारी वर्गाने दगडफेक देखील केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांना महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे, असा आरोपही या कर्मचारी वर्गाने केला आहे.

कर्मचारी अचानकपणे शरद पवार यांच्या निवास्थानाच्या आवारात शिरले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक आणि चप्पलफेक देखील केली. शिवाय, शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या ठिकाणी मोजकाच पोलीस बंदोबस्त असल्याने आणि आंदोलक कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने बराच गोंधळ देखील उडाला आहे. आंदोलक कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेरच ठिय्या दिला आहे. पोलिसांचा फौजफाटा पवारांच्या निवास्थानी दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील सिल्व्हर ओकवर दाखल झाल्या असून त्यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चेची तयारी दर्शवत, शांतता राखण्याचे आंदोलकांना आवाहन केले आहे.

दुसरीकडे पोलीस आंदोलक कर्मचाऱ्यांना एका स्कूल बसमध्ये बसवून आझाद मैदानाकडे नेत आहेत. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते देखील सिल्व्हर ओक येथे दाखल झाले असून, शरद पवारांच्या समर्थानार्थ घोषणबाजी सुरू केली आहे. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. न्यायालयाने काल एसटी विलिनीकरणासंदर्भात निकाल दिला. त्यानंतर कोर्टाबाहेर न्यायव्यवस्थेचा जयजयकार झाला. त्यानंतर आज अचानक शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला. सिल्व्हर ओक हे शरद पवार यांचे खासगी निवासस्थान आहे, सरकारी निवासस्थान नाही. सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची पत्नी,नात, नातू राहतात. अशाप्रकारे एखाद्या नेत्याच्या घरावर हल्ला करणे महाराष्ट्राची संस्कृती नाही.

ज्या पद्धतीने एसटी आंदोलनाला राजकीय वळण मिळत आहे, ते महाराष्ट्राच्या राजकारणाल शोभणारं नाही. शरद पवार यांनी आजपर्यंत कायम एसटी कर्मचाऱ्यांचे हित पाहिले. एकेकाळी राज्यातील पाचही एसटी संघटना शरद पवार यांचा शब्द मानत. त्यामुळे त्यांच्या घरावरील आजचा हल्ला हा दुर्दैवी प्रकार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत घटनेवर भाष्य केलं आहे. ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागलं ते अनुचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे. या घटनेचा लवकरच तपास केला जाईल,’ अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

‘सिल्व्हर ओकवर दाखल झालेले आंदोलक खरे होते की नाही, हे तपासानंतर स्पष्ट होईल. मात्र राज्यात अशांतता निर्माण करण्याचा आणि त्या माध्यमातून पोलीस प्रशासन आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या 50 -60 वर्षात अशी घटना घडली नव्हती. हा प्रकार जाणीवपूर्वक घडवून आणला असून अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत,’ असा इशारा गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिला आहे.

‘एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने चर्चेचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणे क्रमप्राप्त आहे. सांविधानिक मार्गाने तसेच संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न समोर मांडावेत.आंदोलनाला अनिष्ट वळण देऊन कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये,’ असं आवाहनही गृहमंत्र्यांनी एसटी आंदोलकांना केलं आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’ इथं दाखल झाले असून ते पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये