दुसऱ्याच्या घराबाहेर धार्मिक श्लोकाचे पठण वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंग : उच्च न्यायालय

मुंबई : एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या निवासस्थानी किंवा त्याच्या निवासस्थानाबाहेर धार्मिक श्लोकांचे पठण करण्याची घोषणा करणे, हे त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दाम्पत्याची घोषणाही वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंगच असल्याचे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधातील दुसरा गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळली.
पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो रद्द करण्याच्या मागणीसाठी दाम्पत्याने सोमवारी सकाळी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच त्यावर तातडीच्या सुनावणीची मागणी केली होती. त्यानुसार ही सुनावणी झाली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याच्या राणा दाम्पत्याच्या घोषणेने समाजात अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती हे पोलिसांचे म्हणणे अनुचित नाही, असे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी नमूद केले आणि राणा दाम्पत्याला दिलासा देण्यास नकार दिला. राणा दाम्पत्याविरोधात नोंदवण्यात आलेले गुन्हे हे दोन स्वतंत्र, भिन्न घटना असून त्या एकाच घटनाक्रमाचा भाग नाहीत, हेही न्यायालयाने राणा दाम्पत्याला दिलासा नाकारताना स्पष्ट केले. असे असले तरी त्यांना अटक करायची झाल्यास त्याआधी ७२ तासांची नोटीस देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
एकाच घटनेबाबत एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल केले जाऊ शकत नाहीत. एकच घटना विभागून वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याची कायद्यात मुभा नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये स्पष्ट केले आहे. असे असतानाही राणा दाम्पत्यावरही मुंबईत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल पहिल्या गुन्ह्यात कोठडी मागतेवेळी राजद्रोहाचे अतिरिक्त कलम लावण्यात आले. पोलिसांच्या कामात अडथळे आणल्याप्रकरणी (भादवि कलम ३५३) राणा दाम्पत्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा एकाच घटनेचा भाग आहे, तर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता काय, तसेच पहिल्या गुन्ह्यात कोठडी मागतेवेळी अतिरिक्त कलम लावण्यात आले, तेव्हाच कलम ३५३ चा समावेशही का करण्यात आला नाही, असा प्रश्न राणा दाम्पत्याच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड्. रिझवान मर्चंट यांनी उपस्थित केला.
राणा दाम्पत्यांविरोधातील दोन्ही गुन्हे हे वेगळय़ा घटनांचे परिणाम आहेत. पहिला गुन्हा हा मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाची घोषणा करून कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न उद्भवेल अशी स्थिती निर्माण करण्याबाबत आहे, तर दुसरा गुन्हा हा अटक करतेवेळी महिला पोलिसाला धक्काबुक्की करून कर्तव्यात अडथळे आणण्याबाबतचा आहे. त्यामुळे दोन्ही वेगवेगळय़ा घटना असल्याचा दावा विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. तसेच राणा दाम्पत्याला मज्जाव करुनही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा हट्ट कायम ठेवल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही घरत यांनी न्यायालयाला सांगितले.




