Bjp mns alliance : मनसेसोबत युतीबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले…

पुणे : भाजप आणि मनसेची भूमिका सारखीच असल्याने मनसेसोबत भाजप.युती करणार का या चर्चांना राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये उधाण आलं आहे. आता मनसेसोबतच्या युतीबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीसंदर्भात भाष्य केलं. मनसेसोबत सध्या युती नाही असे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. राज ठाकरे भविष्यातील मित्र असतील मात्र आता युतीची काही शक्यता नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. मनसेसोबतच्या युतीचा निर्णय राष्ट्रीय कार्यकारणी घेईल म्हणजेच मनसे सोबतच्या युतीचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या मनसेसोबतच्या युतीसंदर्भात बोलताना, “भाजप कुठल्याही पक्षाला बरोबर घेताना राज्याची आमची कोअर कमिटी निर्णय घेते. खास करुन मनसेसारखा निर्णय तर आमचा केंद्रात होईल,” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. तसेच पुढे बोलताना, “मनसेची अमराठीसंदर्भातील जी भूमिका आहे त्याच्यामध्ये आम्हाला केंद्रानेच विचार करावा लागेल. आज तरी मनसेसोबत युतीचा कुठलाही प्रस्ताव आमचा नाही,” असंही भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलं.




