या उपकरणाद्वारे बीआरटीत घुसणाऱ्या खासगी वाहनांवर होणार कारवाई

पुणे : बीआरटीत होणारी खासगी वाहनांची घुसखोरी रोखून या खासगी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी आता स्वयंचलित बूम बॅरिअर्स बसविण्यात येणार आहेत. या बूम बॅरिअर्सला कॅमेरे बसविण्यात आले असून खासगी गाड्यांचे क्रमांक त्याद्वारे वाहतूक पोलिसांना कळणार आहेत. बीआरटीतील खासगी वाहनांच्या घुसखोरीमुळे अपघात होत असून त्यात काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बीआरटी मार्गात घुसखोरी करणा-या खासगी वाहनांची छायाचित्रे स्वयंमचलित कॅमे-याने टिपली जाणार आहेत. सध्या १२ ठिकाणी ही उपाययोजना राबविण्यास सुरूवात झाली आहे.

बीआरटी केवळ पीएमपीच्या गाड्यांनीच वापरणे अपेक्षित आहे. मात्र खासगी वाहने या मार्गात घुसखोरी करतात. त्यामुळे बीआरटीचा उद्देश फोल ठरत असून वेगालाही फटका बसत आहे. पीएमपीच्या ताफ्यात सध्या १ हजार ५०० गाड्या आहेत. या सर्व गाड्यांच्या क्रमांकाची नोंद कॅमे-यात संकलित करण्यात आली आहे. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील गाड्या या मार्गावरून धावू शकतील. मात्र पीएमपी व्यतिरिक्त जी खासगी वाहने बीआरटी मार्गात प्रवेश करतील, त्यांची काही सेकंदात स्वयंचलित नोंद होईल. त्याची माहिती पीएमपीकडून वाहतूक पोलिसांना दिली जाईल. त्याची छायाचित्रेही उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे बीआरटी मार्गातील खासगी वाहनांची घुसखोरी थांबेल, असा दावा पीएमपीने केला आहे.









