महाराष्ट्र

अविनाश भोसलेंची लंडनमध्ये 300 कोटींची संपत्ती खरेदी; CBI आरोपपत्रात उल्लेख

पुणे : सीबीआयने यस बँक आणि डीएचएफएल प्रकरणामध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रामध्ये अटकेत असलेल्या पुण्यातील बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांनी वेगवेगळ्या माध्यमातून मिळवलेला ३०० कोटींचा निधी लंडनमध्ये संपत्ती विकत घेण्यासाठी वापरल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

अविनाश भोसले यांना २०१८ साली यस बँकेचे राणा कपूर यांच्या माध्यमातून ७०० कोटींचं कर्ज देण्यात आलं होतं. याच पैशातून भोसले यांनी लंडनमधील फाइव्ह स्ट्रॅण्ड येथे संपत्ती विकत घेतली असून तिची किंमत आता एक हजार कोटी इतकी आहे. आरोपपत्रामधील माहितीनुसार भोसले यांच्या मालकीच्या कंपनीला ६८ कोटी ८२ लाख रुपये हे सल्लागार फी, १८३ कोटी रुपये डीएचएफलकडून कर्ज म्हणून मिळाले. तर कंपनीने स्वत: ३१७ कोटी ४० लाख रुपये हे रेडियस समुहाकडून घेतले.

“तपासामध्ये या एकूण ५६९ कोटी २२ लाख रुपयांपैकी ३०० कोटी रुपये अविनाश भोसले यांनी फाइव्ह स्ट्रॅण्ड येथे संपत्ती विकत घेण्यासाठी वापरले. या संपत्तीची तेव्हाची किंमत ९२.५ मिलियन जीबीपी (ब्रिटीश चलन) इतकी होती. त्यांनी ही संपत्ती युनायटेड किंग्डममधील नोंदणीकृत कंपनी असणाऱ्या फ्लोरा डेव्हलपमेंट लिमिटेडच्या माध्यमातून विकत घेतली. या व्यवहारासाठी ७० जीबीपी मिलियनची रक्कम कर्ज स्वरुपात आरोपी राणा कपूर किंवा यस बँक यांनी एप्रिल २०१८ मध्ये फ्लोरा डेव्हलपमेंट्स लिमिटेडला दिली,” असं सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटलंय.

केंद्रीय तपास यंत्रणेनेनं आरोपी कपील वाधवान, धीरज वाधवान, राणा कपूर, संजय राजकुमार छाबरिया, अविनाश भोसले, सत्यन गोपालदास तंडन यांनी एकत्र मिळून यस बँकेची आर्थिक फसवणूक करण्याची योजना बनवण्याचंही आरोपपत्रात म्हटलंय.

“२०१८ साली कपील आणि धीरज वाधवान यांनी बेकायदेशीरपणे ४ हजार ७३३ कोटी रुपयांचा निधी हा गुंतवणूक किंवा कर्जाच्या माध्यमातून यस बँककडून डीएचएफएल आणि बिलीफ रिलॅलिटर्स प्रायव्हेट लिमिटेडकडे वळवला. हा पैसा त्यांना बेकायदेशीररित्या वळवण्यासाठी कपूर, छाबरिया आणि भोसले यांच्या कंपन्यांनी मदत केली,” असं आरोपपत्रात म्हटलंय. हा सर्व पैसा कर्ज, आयसीडी गुंतवणूक किंवा सल्लागार म्हणून देण्यात आलेल्या फीच्या माध्यमातून वळवण्यात आल्याचं सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये