चंद्रकांत पाटील यांना गृहमंत्री पद ? पाटील यांच्या रूपाने वीस वर्षांनी कोथरूडला मिळणार मंत्रीपद

पुणे : उद्या शिंदे सरकारचा मंत्री मंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता असून या मंत्रिमंडळात कोणाला कोणते मंत्री पद मिळणार याबाबत चर्चा रंगताना दिसत आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्थान निश्चित मानले जात असून त्यांना नेमके कोणते मंत्रीपद मिळणार याबाबत कोथरूडकर नागरिकांमध्ये उत्सुकता आहे तर राजकीय कार्यकर्त्यांमध्ये त्यांना मिळणाऱ्या मंत्रिपदावरून विविध तर्क लढवले जात आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोथरूड मतदार संघाला पहिल्यांदा मंत्रिपद मिळणार आहे. यापूर्वी शिवसेना नेते शशिकांत सुतार यांना कृषी मंत्री पद मिळाले होते. मात्र तेव्हा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ होता. नव्याने निर्माण झालेल्या कोथरूड मतदारसंघात मंत्री पदी वर्णी लागणारे चंद्रकांत पाटील पहिले आमदार ठरणार आहेत. पाटील यांना चांगले मोठे खाते मिळणार असल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. पाटील यांना गृहमंत्री पद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र महसूल मंत्री हे मोठे खाते ही त्यांना मिळू शकते असेही बोलले जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा सामना चंद्रकांत पाटील करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने पाटील यांची गृहमंत्री पदी नेमणूक करण्याचे ठरविले असल्याची चर्चा आहे.
पुण्याचे पालक मंत्री कोण?
पुण्याचे पालक मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांना गृहमंत्री पदा सोबतच पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.







