ठाकरेंचा निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव: पक्ष नाव म्हणून ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’; तर चिन्हासाठी उगवता सूर्य, त्रिशूळ, मशालला पसंती

मुंबई : शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) या पक्ष नावाने उद्धव ठाकरेंचा गट अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवू शकतो. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटाने पक्षाचे नवीन नाव व चिन्हांची यादी सादर केल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवल्यावर उद्धव ठाकरेंनी थेट जनतेशी संवाद साधला आहे.

माहितीनुसार, ठाकरे गटाने पक्षाचे नवीन नाव म्हणून शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाला पहिली पसंती दिली आहे. तर, दुसऱ्या पसंतीचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे सुचवण्यात आले आहे. तसेच, निवडणूक चिन्ह म्हणून उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ या चिन्हांवर दावा केला आहे. शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला. तसेच, या दोन्ही गटांना ‘शिवसेना’ हे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.



आपल्याशी काही जणांनी गद्दारी केली. मुख्यमंत्रीपदी ज्यांना पाहिजे होते, त्यांनी ते घेतले. ज्यांना सर्वकारी दिले, तेही गेले. आपण काय बोललो नाही. मात्र, आता अति होत आहे. शिवसेनाप्रमुख व्हायला निघाले आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.






