गुलाबराव पाटलांची जीभ घसरली; सुषमा अंधारेंचा केला असा उल्लेख

मुंबई/जळगाव : राजकारणाचा स्तर घसरत चाललाय, अशी खंत सामान्य माणूस व्यक्त करत असतानाच सुषमा अंधारेंवर टीकास्र सोडताना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली आहे. जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटलांनी हे विधान केलं आहे. शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यात मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे.

अलीकडेच सुषमा अंधारे यांची गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघात सभा आयोजित केली होती. परंतु पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. यामुळे सुषमा अंधारेंनी ऑनलाईन पद्धतीने सभा घेत गुलाबराव पाटलांवर जोरदार टीका केली. तसेच गुलाबराव पाटील दबावतंत्राचा वापर करून आपली सभा रोखू इच्छित आहेत, असा आरोपही त्यांनी केला. अंधारे यांच्या आरोपानंतर गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
सुषमा अंधारेंवर टीकास्र सोडताना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली आहे. त्यांनी सुषमा अंधारेंचा उल्लेख ‘नटी’ असा केला आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, “सुषमा अंधारेंना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा पिक्चर कुठेच चालला नाही, त्यामुळे त्या शिवसेनेत आल्या. ठाकरे गटालाही नटीची गरज होती. ज्याप्रमाणे एखादा पिक्चर काढण्यासाठी अभिनेत्रीची गरज असते, त्याप्रमाणे यांनाही (ठाकरे गटाला) एखादी बाई पाहिजे होती. त्यामुळे त्यांनी आपल्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. ती एक बाई आहे, माणूस असते तर गुलाबराव कोण आहे, हे दाखवलं असतं” अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी टीकास्र सोडलं.






