येरवडा मध्यवर्ती कारागृहात तरुण आरोपीचा मृत्यू

पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात एका तरुण आरोपीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, मुलाचा मृत्यू कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे, असा आरोप मृत आरोपीच्या कुटुंबियांनी केला आहे. संदेश अनिल गोंडेकर (वय २६ रा. डोणजे, ता हवेली, सध्या रा. कोल्हेवाडी, खडकवासला) असे मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे. कारागृह अधिक्षकांनी मात्र मृत आरोपीच्या कुटुंबियांचे आरोप फेटाळले आहेत.
संदेश गोंडेकर याला २०१८ साली हवेली पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती. तेव्हापासून संदेश येरवडा मध्यवर्ती होता. मोलमजुरी करणारे त्याचे वडील अनिल गोंडेकर व धुण्याभांड्याची कामे करणारी आई कलावती गोंडेकर हे दोघेही दर शनिवारी येरवडा मध्यवर्ती कारागृहात मुलगा संदेश याला भेटण्यासाठी जात असे.
२४ डिसेंबरला वडील अनिल गोंडेकर यांचे संदेश याच्याशी शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर शनिवार ३१ डिसेंबर २०२२ रोजी संदेशचे आई-वडील नियमितप्रमाणे भेटण्यासाठी कारागृहात गेले होते. सकाळी साडेआठ वाजता भेटण्यासाठी नंबर लावून दुपारी १२ वाजेपर्यंत ते बाहेर थांबले होते. मात्र, अचानक दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांना हवेली पोलीस ठाण्यातून संदेशचा ससून रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला असल्याचे फोनवरुन सांगण्यात आले.




