अमृता फडणवीसांचा स्विमिंग पूलमधील फोटो शेअर करत सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना सवाल; म्हणाल्या “नंगटपणा हा…”

मुंबई : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि केतकी चितळे यांचे अर्धवट कपड्यातील फोटो शेअर करत चित्रा वाघ यांना उर्फी जावेदच्या वेशभूषेवर तुमचा आक्षेप असेल तर असाच आक्षेप तुम्ही कंगना राणौत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेणार का? यांनाही तुम्ही मारहाणीची भाषा वापराल का? असा सवाल विचारला आहे.
सुषमा अंधारेंनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं,“नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धीझोतात आणि चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल…” असा टोला सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना लगावला आहे.
मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर…
Posted by Andhare Sushama on Monday, January 2, 2023
“मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त ‘कम्फर्टेबल’ आणि ‘कॉन्फिडंट’ वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव बहुतांशी वेळा साडीच असतो, फार फार तर मी सलवार सूट परिधान करते. यामुळे इतरांनीही माझ्यासारखाच पेहराव करावा, असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये ‘कम्फर्टेबल’ वाटतं, त्याप्रमाणे तो कपडे परिधान करतो. प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरजसुद्धा असते. उदाहरणार्थ, टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच…”
“अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया… पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल, तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी? उर्फी जावेदसारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणौत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का? किंवा त्यांना मारहाणीची भाषा कराल का?” असा सवाल अंधारेंनी फेसबूक पोस्टद्वारे विचारला.
