गिरीश भाऊ अचानक मिरवणुकीत सहभागी झाले आणि गळ्यात ताशा घालून वाजवायला लागले ; चंद्रकांत मोकाटे यांनी दिला आठवणींना उजाळा

पुण्याचा गणेशोत्सव व विसर्जन मिरवणूक ही एक मोठी परंपरा आहे. मी सार्वजनिक जीवनात गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणून कोथरूडमध्ये सामाजिक कामाची सुरुवात केली. गेली पंचवीस-तीस वर्षापूर्वी समस्त गावकरी मंडळाची मिरवणूक कुमठेकर रस्त्यावरून जात असत. एक वर्षी ढोल-ताशाचा गजर रंगात आला होता कार्यकर्ते गणपती बाप्पा मोरया चा जल्लोष करीत होते, अचानकपणे गिरीश भाऊंनी गणपती मंडळाच्या मिरवणुकीत सहभाग घेऊन ताशा गळ्यात घातला आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत ताशा वाजवायला सुरुवात केली तेव्हापासून गिरीश भाऊंच्या आणि माझ्या मैत्रीला सुरुवात झाली. गिरीश भाऊ आणि मी दोन वेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते ते पक्षाध्यक्ष, नगरसेवक आमदार म्हणून मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आज आपल्यात गिरीश भाऊ नाहीत यावर विश्वास बसत नाही पण त्यांच्या बरोबरच्या आठवणीची शिदोरी कायम बरोबर असणार आहे.
मित्र प्रेमाला जगणारा पुणेकरांच्या दुखात आणि सुखात सहभागी होणारे, कोथरूडकर नागरिकांच्या हाकेला हो देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी अनेक जबाबदाऱ्या घेतल्या. राजकीय जीवनामध्ये अनेक चांगले वाईट प्रसंग येतात अशावेळी थोरल्या भावाची जबाबदारी घेऊन त्यांनी मला साथ दिली. चवीने खाणारे, मैफिल जमवणारे गिरीश भाऊ मैफिलीत आले की वेगळी जान येत असे. छोट्या-मोठ्या कार्यकर्त्याला नावानिशी दिलखुलास दाद देत प्रत्येकाला आपलेसे करणारे गिरीश भाऊ पुणेकरांना माहित आहेत. उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको या उक्तीप्रमाणे चालणारे भाऊ यांनी पुण्याच्या राजकीय क्षेत्रात पक्षाचा कार्यकर्ता, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि पुण्याचे खासदार म्हणून त्यांनी सातत्याने पुण्याच्या विकासाचे काम केले.
नाट्य, चित्रपट संगीत याचाही ते सातत्याने आस्वाद घेत असत. पुण्याच्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, क्रीडा क्षेत्रातील मंडळींशी ते कायम संवाद साधत असत. पुण्यातील विविध कार्यक्रमात त्यांचा वावर असायचा पुणेकरांनी भाऊंवर वेळोवेळी राजकीय जबाबदारी दिली आणि त्यांनी ती पार पाडली. त्यांच्या कार्याचा लेखाजोखा दर वर्षी ते नागरिकांना देत असत. असे खूप कमी होऊन गेले आहेत की जे नागरिकांची आणि मतदारांची बांधीलकी जपत त्यांपैकी गिरीश भाऊ एक होते.
मी आमदार असताना नागपूर आधिवेश काळात आम्ही सगळे सकाळी लवकर चालण्याच्या व्यायामासाठी बाहेर पडत, त्यासाठी त्यांना सकाळी उठवण्यासाठी मी जात. सुरवातीला ते चालण्यासाठी आले, नंतर त्यांना यायचे नसेल तर ते रात्री पायात वॉकिंग चे शूज घालून झोपत व मी सकाळी उठवायला गेलो तर ते सांगत मी आताच चालून आलोय तुम्ही जा. माझ्या लक्षात यायचे पण ते मला नाराज करायला नको म्हणून असा बहाणा करत. कार्यकर्त्याचे मन कसं जपायचं हे त्यांना माहीत होत. म्हणूनच माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनात त्यांनी घर केलं होत.
माझं आणि त्यांचं वेगळं नातं होतं, ते मी शब्दात व्यक्तही करू शकत नाही. सेना ,भाजप युती म्हणून आम्ही एकत्र असताना एकनिष्ठतेने पक्षासाठी काम केले. त्याचे अनेकांनी वेगळे अर्थ ही काढले, पण त्याचा काही परिणाम आमच्यावर झाला नाही.
अनेक वेळा पुणेकरांनी विविध विषयांवर त्यांना ट्रोल केले पण भाऊ हे पक्के पुणेकर म्हणून त्याला सामोरे गेले पुण्याजवळील तळेगाव येथे गिरीश भाऊंचा जन्म झाला नंतर भाऊ पुण्यात आले पक्के पुणेकर झाले आणि राजकीय क्षेत्रात स्वकर्तुत्वाने त्यांनी दिल्लीला भरारी मारली. त्यांचा मित्र म्हणून मला त्यांचा अभिमान कायम राहील. लोकसभेत पुण्याच्या प्रश्नाविषयी ते कायम आग्रही राहीले. आपले वेगळेपण जपणाऱ्या माझ्या मार्गदर्शकाला भावपूर्ण श्रद्धांजली !
चंद्रकांत मोकाटे
माजी आमदार




