वारजे हायवे परिसरात दूषित पाणी पुरवठा ; दिपाली धुमाळ यांनी दिला प्रशासनाला इशारा

वारजे : वारजे हायवे परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला असून अनेक जणांना आरोग्याच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. गांधी भवन टाकी ते डुक्कर खिंड टाकी दरम्यानची पाईप लाईन एल अँड टी कंपनीने वॉश आऊट करताना चुका घडल्याने हा दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याचे सांगितले जात आहे.
महापालिका पाणी पुरवठा विभाग व लाईन एल अँड टी कंपनी मध्ये समन्वय नसल्याने हा प्रकार घडला असून दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही व शुद्ध पाण्याचा पुरवठा केला नाही तर त्यांचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील असा इशारा माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी दिला आहे.
गांधी भवन टाकी ते डुक्कर खिंड टाकी दरम्यानची पाईप लाईन एल अँड टी कंपनीने काल वॉश आऊट केली. हे करताना चुका घडल्याने जकात नाका ते संपूर्ण हायवे परिसरात दूषित पाणी पुरवठा झाला आहे. पाण्याला वेगळा वास येत असून चवही बदलली आहे. हे दूषित पाणी पिल्याने घशाच्या तक्रारी जाणवू लागल्या असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
हे सर्व होत असताना प्रशासन मात्र नागरिकांच्या आरोग्याशी खेळून बिनधास्त कसे असा प्रश्न धुमाळ यांनी उपस्थित केला आहे. एल अँड टी कंपनी आणि महापालिका प्रशासन यांच्यातला हा गोंधळ किती दिवस चालणार आहे आणि त्याचा त्रास नागरिकांनी किती दिवस सहन करायचा असा सवाल केला जात आहे. कोणतही काम करताना आधी सूचना देणे आवश्यक होते, मात्र तसे न झाल्याने दूषित पाणी आल्याने नागरिकांच्या प्यायच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी पुरवठ्याचे अधिकारी ही सातत्याने बदलले जात असल्याने नागरिकांनी तक्रारी कोणाकडे करायच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासन मात्र या सगळ्या प्रकाराबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.




