Video : पुण्यात भरदिवसा रस्त्यात MPSC करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने वार

पुणे : एमपीएससीच्या परीक्षेत तिसऱ्या आलेल्या (MPSC Exam) दर्शना पवार या युवतीच्या खूनाची घटना ताजी असतानाच एका विद्यार्थिनीवर तरुणाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबद्दल आणि पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. पुण्यात हे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात की अन्य कारणांसाठी याचीही चर्चा आता होऊ लागली आहे.
तरूणीवर एकतर्फी प्रेमातूनच हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदाशिव पेठेत ही घटना घडली. ज्यावेळी तरुणानं त्याच्या मैत्रिणीवर कोयत्यानं हल्ला केला, त्यावेळी तिच्यासोबत त्यांचा आणखी एक मित्रही होता. तरुणानं तिच्यावर कोयत्यानं हल्ला केला. त्यावेळी हल्ल्यात जखमी झालेली तरुणी जीव मुठीत घेऊन सदाशिव पेठेत पळत सुटली. तिचा मित्र कोयता घेऊन तिच्या मागे पळत होता. ती उपस्थितांकडे मदतीसाठी याचनाही करत होती. पण तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही.काही काळानं एक तरुण तिच्या मदतीसाठी धावून आला. कोयता हातात असलेला तरुण तरुणीच्या डोक्यावर प्रहार करणार एवढ्यात मदतीसाठी धावून आलेल्या तरुणानं कोयता धरला आणि हल्लेखोर तरुणाला रोखलं. त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला. उपस्थितांनी घडलेल्या धक्कादायक प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं आहे.







