राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाकडे किती आमदार याचा होणार निर्णय; आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन

मुंबई : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. त्यामुळे दुखावलेले विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होणार की अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट सत्तेत आल्याने सत्ताधारी वरचढ ठरणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
पुरेसा पाऊस न झाल्याने अडचणीत आलेला शेतकरी, महागाई यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते असणारे अजित पवार आता सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडे अर्थ मंत्रीपदाची जबाबदारी आहे. विशेष म्हणजे मागील अधिवेशनात त्यांनी अर्थसंकल्पावर टीका केली होती. आता, टीका केलेल्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी त्यांना करायची आहे.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. हे अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सभागृहातले चित्र कसे असणार? राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांना धारेवर धरणार? याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. सकाळी 11 वाजता विधानसभा तर दुपारी 12 वाजता विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.



राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाकडे किती आमदार आज फैसला?
राष्ट्रवादी कॉग्रेस मधल्या फुटीनंतर कोणत्या गटाकडे किती आमदार हे समोर आलेलं नाही. अजित पवार गटाने आपल्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. तर जयंत पाटील यांनी आमच्याकडे 19 आमदार असल्याचे म्हटले. 9 मंत्री वगळता इतर आमदारांची विरोधी पक्षात बसण्याची व्यवस्था करावी असं पत्र जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. त्यामुळे कोणाच्या गटात किती आमदार हे आज स्पष्ट होईल. जितेंद्र आव्हाडांनी व्हीप जारी केला आहे. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोडा मैदान लांब नाही उद्या समजेल काय आहे, असे सूचक वक्तव्य केले.



अजित पवार सत्तेत सामिल झाल्यानंतर बदललेल्या समीकरणानुसार कॉग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसकडून दावा केला जाणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट सांगितलं आहे. तर, दुसरीकडे विधान परिषद आमदार डॉ. निलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे शिवसेनेत गेल्यामुळे ठाकरे गटाकडे असलेले विधान परिषद विरोधी पक्षनेते पद सुद्धा जाण्याची शक्यता आहे. या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा करण्याची शक्यता आहे. सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार भाजप 22, काँग्रेस 9, ठाकरे गट 8, राष्ट्रवादी (पवार गट) 4, राष्ट्रवादी (अजितदादा गट) 5, शिवसेना 3, इतर 6 आणि 21 पद रिक्त आहेत.






