कोथरुड

विद्यापीठ चौकातील नव्या उड्डाणपुलाचा आराखडा आठवडाभरात अंतिम होईल-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाजवळील नवीन उड्डाणपुलाचा आराखडा टाटा प्रोजेक्ट्स आणि वाहतूक पोलीस यांच्यातील समन्वयाने पुढील आठवड्यात अंतिम केला जाईल अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितली.

नव्या उड्डाणपुला संदर्भात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवारी) सकाळी बैठक झाली. त्यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, कलेक्टर नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त (वाहतूक) संजय शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) सुरेंद्र देशमुख, विभागीय आयुक्त सौरभ राव, पीएमआरडीएचे सुहास दिवसे, टाटा प्रोजेक्ट्सचे अधिकारी उपस्थित होते. नवीन पुलाच्या आराखड्याबद्दल व्यापक चर्चा झाली. टाटा प्रोजेक्ट्स आणि वाहतूक पोलीस यांच्या समन्वयानंतर पुढच्या आठवड्यातच हा आराखडा अंतिम होईल.

पालमंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोना साथ आणि स्मार्ट सिटी या विषयांवरही चर्चा झाली. आयसीएमआर च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सिरो सर्व्हे करण्यात यावा अशी सूचना आमदार शिरोळे यांनी केली. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत सर्व्हे करताना आर्थिक घटक आणि असंघटीत क्षेत्राचाही समावेश करावा असेही शिरोळे यांनी सुचविले.

शहरातील दुकानांची वेळ संध्याकाळी ०७ ऐवजी रात्री ०९ वाजेपर्यंत वाढवून द्यावी, रेस्टॉरंट्स चालकांना अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जावू नये, तसेच जिम, क्रीडांगणे, उद्याने सुरु करावीत, स्मार्टसिटीच्या शिल्लक निधीनुसार निवीदा मागवून विकासकामे सुरु करावीत अशा मागण्या सिद्धार्थ शिरोळे यांनी बैठकीत केल्या.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये