पुण्यातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ताम्हिणी व वरंधा घाट मार्गांची दुरुस्ती करावी ; एसटीच्या जादा बसेसही कोकणात सोडाव्यात

कोकण कृती समिती पुणेच्या वतीने संबंधित विभागांकडे मागणी
पुणे : ७ सप्टेंबर 2024 पासून गणेशोत्सव व गौरी गणपती या सणास सुरुवात होत आहे. गणेशोत्सव व गौरी गणपती हा सण कोकणातील फार मोठा आनंदाचा उत्साहाचा व पारंपरिक सण आहे. हा सण साजरा करण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातून मोठ्या प्रमाणात कोकणातील आपापल्या गावाला जाणाऱ्या चाकरमान्यांना वरंधा घाट व तम्हणी घाट या दोन मार्गांवर अडचणी येऊ नयेत याची खबरदारी घ्यावी तसेच ज्यादा एसटी बसेसचे नियोजन करावे अशी मागणी कोकण कृती समिती पुणेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागण्यांचे निवेदन कोकण कृती समिती पुणेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे विभागाचे अधिक्षक अभियंता व एस टी महामंडळ, पुणे चे विभागीय नियंत्रण अधिकारी यांना देण्यात आले आहे यावेळी माजी नगरसेवक बाबा धुमाळ, सुरेश सकपाळ, प्रकाश यादव, सुनील पवार, गणेश जाधव, सचिन दिघे, परेश आंगणे, रवींद्र कदम, राजू कदम आदी उपस्थित होते.

कोकणात जाण्यासाठी असणारा ताम्हीणी घाट मार्ग व भोर वरंधा घाट मार्ग सध्या पावसाळा असल्यामुळे या दोन्ही मार्गावर धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. पावसामुळे सदर रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. अनेक ठिकाणी दरड कोसळत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना या मार्गांवरून प्रवास करणे सुरक्षित वाटत नाही. तरी सार्वजनिक विभागामार्फत सदर रस्त्यांची पाहणी करून गणेशोत्सव व गौरी गणपती सुरू होण्याच्या आत दुरुस्ती करून घेण्यात यावेत तसेच सदर मार्गावर गणपतीच्या दिवसांमध्ये शक्यतो २४ तास आपल्या विभागाचे कर्मचारी जेसीबी व इतर साहित्य जे आपतकालीन परिस्थिती मध्ये उपयोगी येतील अशी यंत्रणा त्या ठिकाणी तैनात करावी व लवकरात लवकर हे दोन्ही मार्ग कोकणवासीय चाकरमानी यांना गावाला जाण्यासाठी सुरळीत सुलभ व सुरक्षित सोईस्कर रित्या सुरू करून देण्यात यावे ही अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनात करण्यात आली आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातून एस टी ने गणेशोत्सव काळात कोकणात जाणारे चाकरमनी मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे गणेशोत्सवा निमित्ताने कोकणात प्रामुख्याने रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या ज्यादाच्या एस टी बस वाढवून देऊन जास्तीत जास्त नागरिकांना गावी जाता येईल अशी व्यवस्था करावी व तसे एस टी बस चे वेळापत्रक सविस्तर जाहीर करावे अशी मागणीही एस टी महामंडळाच्या पुणे विभागाकडे कोकण कृती समिती पुणे च्या वतीने करण्यात आलेली आहे.















