राज्यातील जनता सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी- जयंत पाटील

मुंबई : बेळगावसह सीमाभागात आज मराठी बांधवांकडून काळा दिन पाळला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार भक्कमपणे उभं असल्याची ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यांनी काळी फित लावून कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचाही निषेध नोंदवला.आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात सामील होईल”, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

बेळगावसह सीमाभागात आज काळा दिवस पाळण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला.
कर्नाटकरात मराठी बांधवांवर होणारा अन्याय, अत्याचाराचा निषेध मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हाताला काळी फित लावून निषेध व्यक्त केला. राज्य सरकारमधील सर्व मंत्रीही आज निषेध व्यक्त करत असल्याचं जयंत पाटील म्हणाले. राज्यातील जनता सीमा भागातील मराठी भाषिक लोकांच्या मागे पूर्ण ताकदीने उभी आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असलं तरी कर्नाटकमधील मराठी बांधवांवरील अन्याय थांबलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा निषेध नोंदवत असल्याचं जयंत पाटील म्हणाले.



मराठी बांधवांनी कानडी सरकारची बंदी झुगारली
दरवर्षीप्रमाणे आजही काळा दिन रॅलीला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. सोबतच काळे कपडे घालायलाही मनाई करण्यात आली आहे. मात्र, ही बंदी झुगारून सीमा भागातील मराठी बांधव मराठा भवन येथे एकत्र आले. यावेळी त्यांनी मराठी भाषिकांवर होणाऱ्या दडपशाहीचा निषेध नोंदवला. सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच असेल असं म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री सवदी यांचाही मराठी भाषिकांनी चांगलाच समाचार घेण्यात आला. शिवाय सीमाप्रश्नी अग्रेसर असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रात सत्तेत आहेत. त्यामुळे हा प्रश्न आतातरी तडीस लागेल, अशी आशा या मराठी भाषिकांनी व्यक्त केली आहे.



