कोथरुड

भुसारी कॉलनी, बावधन प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेवक आक्रमक भूमिकेत ; या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना धरले धारेवर

कोथरूड बावधन महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयात पार पडली बैठक

कोथरूड : प्रभागात वाढलेली अतिक्रमणे आणि स्वच्छता या प्रश्नावर आज प्रभाग क्रमांक १० बावधन, भुसारी कॉलनी मधील नगरसेवकांनी कोथरूड बावधन महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत याबाबत जाब विचारला.. तसेच या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

प्रभाग क्रमांक १० बावधन, भुसारी कॉलनी मधील नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेविका रूपाली पवार यांनी कोथरूड बावधन महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयात आज बैठक घेतली. या बैठकीत नगरसेवकांनी प्रभागातील महत्वाच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली. यावेळी कोथरूड, बावधन महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्त सुहास जाधव, व आरोग्य, अतिक्रमण असे विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Img 20251125 wa01788344877527023851533


प्रभागात वाढलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे तसेच स्वच्छतेचा प्रश्न ही आहे. स्वच्छता कर्मचारी व त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

सिंहासन न्यूजशी बोलताना नगरसेवक किरण दगडे पाटील म्हणाले, रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पदपथावर स्टॉल लावले जात असून नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. मात्र त्याकडे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तसेच स्वच्छतेचे विषयासंदर्भात स्वच्छता कर्मचारी किती व प्रत्यक्षात कामावर किती येतात हाही मोठा प्रश्न आहे, त्यामुळे या सर्व प्रश्नांकडे आम्ही बारकाईने आता लक्ष देणार आहे. प्रशासकीय राजवटीत सुरू असलेला अनागोंदी कारभार आता चालू देणार नाही. स्वच्छ आणि सुंदर प्रभाग करणे ही आमची जबाबदारी आहे.  आज आम्ही उपस्थित केलेल्या अतिक्रमण आणि स्वच्छता या विषयावर तातडीने उपाययोजना नाही झाल्यास त्याचे परिणाम अधिकाऱ्यांना भोगावे लागतील. रस्त्यावर आणि पदपथावर असलेल्या टपऱ्यांवर कारवाई नाही झाल्यास आम्ही सहाय्यक आयुक्त कार्यालयाबाहेर टपऱ्या आणून लावू असा इशारा ही अधिकाऱ्यांना दिला असल्याचे किरण दगडे पाटील यांनी सांगितले.

नगरसेवक दिलीप वेडे पाटील म्हणाले, प्रभागातील विविध विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली त्यातील अतिक्रमण आणि स्वच्छता ही विषय महत्वाचे होते. या दोन मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या आहेत. नागरी प्रश्न सोडवण्याकडे आम्ही प्राधान्याने लक्ष देत आहोत.

Img 20250508 wa00015038950216212096978

नगरसेविका अल्पना वरपे म्हणाल्या समस्या मुक्त प्रभाग करणे ही आमची पहिली जबाबदारी आहे आणि त्यासाठीच आज अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली आहे. या बैठकीत वाढलेली अतिक्रमणे आणि स्वच्छता या विषयाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांचे नागरी प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष आता खपवून घेतले जाणार नाही. या आधी लोकप्रतिनिधी नव्हते त्यामुळे अधिकारी बिनधास्त होते पण आता लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि ते सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आहेत हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे.

नगरसेविका रुपाली पवार यांनीही स्वच्छता हा विषय आरोग्याशी संबंधित असून अधिकाऱ्यांनी त्या कामात कुचराई करू नये तसेच जबाबदारीने काम करावे असे म्हंटले आहे.

या संदर्भात महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्रभाग १० मधील अतिक्रमणांच्या बाबतीत सर्वे आणि पाहणीचे काम हाती घेण्यात येणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे अंदाजे साधारण १५ दिवसांमध्ये हे काम केले जाईल. अशी बैठकीत चर्चा झाली तसेच स्वच्छतेच्या संदर्भातही नियोजनबद्ध काम सुरू आहे. एक एक रस्ता घेऊन आम्ही स्वच्छता करत आहोत. अपुरा स्टाफ असल्यामुळे काही अडचणी येत आहेत. त्याबाबत रिपोर्ट करून संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे पाठवला जाणार आहे. आणखी स्टाफ मिळाला तर अजून चांगले काम करता येईल. आता आहे त्याच स्टाफ मध्ये रोटेशन पद्धतीने वेगवेगळ्या भागात काम केले जात आहे. स्वच्छतेचा प्रश्न योग्य पद्धतीने मार्गी लावला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये