जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर

वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यातील लढत आता स्पष्ट होत आहे. आता बायडन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, मात्र ट्रम्प मतगणनेच्या विरोधात कोर्टात गेल्यानं अंतिम निकाल येण्यासाठी वेळ लागत आहे.
दरम्यान आता बायडन यांनी मतगणना न झालेल्या उर्वरित पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये आघाडी घेतली आहे. तर ट्रम्प यांनी केवळ एका राज्यात आघाडी घेतलीय. पेंसिलवेनिया, नेवाडा, जॉर्जिया आणि एरिजोना मध्ये बायडन आघाडीवर असल्याची माहिती आहे. जॉर्जिया हा रिपब्लिकनचा गड मानला जातो.

जॉर्जिया राज्याच ट्रम्प आणि बायडन यांच्या मतांमधील अंतर चांगलेच वाढले आहे. बायडन आता 4184 मतांनी आघाडीवर आहेत. तर बायडन पेंसिलवेनिया, नेवाडा आणि एरिजोनामधून देखील अनुक्रमे 14541, 20137, 39400 मतांनी आघाडीवर आहेत. यामुळं आता ट्रम्प यांचा विजयाचा रस्ता आणखी कठिण झाला आहे.
बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले
बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले असून त्यांना 264 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत, त्यांना विजयासाठी केवळ 6 मतांची गरज आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर असून त्यांना आतापर्यंत 214 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. विजयासाठी उमेदवाराला 270 इलेक्टोरल मतांची गरज आहे.



दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टात पोहोचले. मतगणनेत घोटाळ्याचा आरोप करत ट्रम्प समर्थकांनी एकीकडे गोंधळ घालायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये निकालाविरोधात केसेस करण्यात आल्या आहेत. यामुळं अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा अंतिम निकाल हाती यायला वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे जो बायडन यांनी आपल्या समर्थकांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कायद्याच्या लढाईमध्ये मदतीसाठी बायडन यांनी आवाहन केलं आहे.



