महायुतीत पुण्याच्या विधान परिषदेच्या जागेवरून खलबते; भाजप की राष्ट्रवादी कोण मारणार बाजी ?

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पुण्यातील जागेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी पुण्याच्या जागेवर जोरदार दावा ठोकल्याने उमेदवारीबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार आणि उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. पुण्याची जागा कोणाला सुटणार यावर आगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे १ जून २०२६ पर्यंत वाटाघाटी सुरू राहणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे मजबूत संख्याबळ असल्याने दोन्ही पक्षांकडून या जागेवर हक्क सांगितला जात आहे. गेल्या काही वर्षांत पुणे जिल्ह्यात भाजपने महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच नगरपालिकांमध्ये आपला प्रभाव वाढवला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही ग्रामीण भागात आपली पकड कायम ठेवत संघटनात्मक ताकद वाढवली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष ही जागा प्रतिष्ठेची मानत आहेत.

भाजपकडून संघटनात्मक काम करणाऱ्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाव असलेल्या काही नावांची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही पुण्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील समन्वय साधू शकणाऱ्या नेत्याच्या नावावर विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महायुतीमध्ये जागावाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असला तरी पुण्याची जागा सोडण्यास दोन्ही पक्ष फारसे तयार नसल्याचे चित्र आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असते तर भाजपने या जागेसाठी एवढा जोर लावला नसता पण दादा नसल्याने त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून संभाव्य उमेदवारांच्या भेटीगाठी, बैठका आणि मोर्चेबांधणीला वेग आला आहे. त्यामुळे पुण्याची जागा अखेर भाजपला मिळणार की राष्ट्रवादी काँग्रेसला, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही पक्षातील शहरातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आपली बाजू वरचढ कशी हे सांगत जागा आपल्याच पक्षाला मिळावी यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, राहुल कुल, शंकर जगताप, भीमराव तापकीर, माजी आमदार संजय जगताप, बाळा भेगडे, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत जागा भाजपलाच सुटली पाहिजे व पक्षाने पुण्याचा जागेवरचा आग्रह सोडू नये अशी भूमिका मांडली आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्तात्रय भरणे, सुनील टिंगरे, निलेश निकम,माजी उपमहापौर दीपक मानकर, विलास लांडे, सुरेश घुले, योगेश बहल या पुणे शहर व जिल्ह्यातील नेत्यांनीही पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच हक्क असल्याचे सांगत या जागेवर दावा सांगितला आहे. तर पक्षाच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेही आपली भूमिका मांडली आहे.
भाजपचे महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर यांनी आमचे ३३३ मतदार असल्याचे सांगत या जागेवर ठाम दावा सांगितला आहे. तर त्याला प्रत्युत्तर देत सुनील टिंगरे, निलेश निकम यांनी आमचे ३४४ मतदार सदस्य असल्याचा दावा करत पुण्याच्या जागेवर राष्टवादीचाच स्वाभाविक हक्क आल्याचे सांगितले होते. त्यामुळे शहर पातळीवरील नेत्यांमध्ये जागेवर वाद सुरू असून ही जागा कोणाला सुटणार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हा तिढा कसा सोडवणार हे पाहावे लागणार आहे. आगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत हा वाद सुरू राहणार असल्याचे दिसत आहे.






